जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, आडगाव बु.च्या शालेय उपक्रमाची राष्ट्रीय चर्चासत्रात दखल

जिल्हा परिषद हायस्कूल

‘शाळा–समुदाय सक्षमीकरण’ विषयावरील सादरीकरणास मान्यवरांची विशेष प्रशंसा

ग्रामीण भागातील शैक्षणिक उपक्रम राष्ट्रीय स्तरावर पोहोचल्याचे गौरवशाली उदाहरण म्हणून जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, आडगाव बु. (ता. तेल्हारा, जि. अकोला) येथील शालेय उपक्रमाची छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित राष्ट्रीय चर्चासत्रात विशेष दखल घेण्यात आली. दिनांक २ ते ४ जानेवारी दरम्यान राष्ट्रीय निपा (NIEPA) व महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागाशी संलग्न सर्वोच्च शैक्षणिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या राष्ट्रीय चर्चासत्रात शाळेच्या समाजाभिमुख उपक्रमांचे प्रभावी सादरीकरण करण्यात आले.

या चर्चासत्रात विद्यालयाचे अधिव्याख्याता डॉ. संतोष गायकवाड यांनी “शाळा व समुदाय अंतरसंबंध सक्षमीकरण” या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर संशोधनाधारित, अनुभवसमृद्ध व परिणामकारक सादरीकरण केले. ग्रामीण भागातील शाळा केवळ शिक्षण देणारी संस्था न राहता समाजाच्या सर्वांगीण विकासाचे केंद्र कसे ठरू शकते, याचे सखोल विवेचन त्यांनी आपल्या सादरीकरणातून मांडले.

डॉ. गायकवाड यांनी शाळा, पालक, स्थानिक स्वराज्य संस्था, शाळा व्यवस्थापन समिती, माजी विद्यार्थी व ग्रामस्थ यांच्या सक्रिय सहभागातून शैक्षणिक गुणवत्ता कशी वाढवता येते, याची प्रत्यक्ष उदाहरणांसह मांडणी केली. विद्यार्थ्यांची नियमित उपस्थिती वाढविणे, गळती रोखणे, शैक्षणिक प्रगतीसोबतच सामाजिक जाणीव विकसित करणे, आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण, व्यसनमुक्ती, स्त्री-पुरुष समानता यासारख्या विषयांवर समुदायाच्या सहभागातून राबविलेले उपक्रम त्यांनी सविस्तरपणे मांडले.

Related News

या सादरीकरणात शाळा–समुदाय समन्वयामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, नेतृत्वगुण, संवादकौशल्य व सामाजिक जबाबदारी कशी विकसित होते, यावर विशेष भर देण्यात आला. तसेच शाळेच्या उपक्रमांमुळे पालकांचा शाळेवरील विश्वास वाढला असून, शिक्षण प्रक्रियेत पालक सक्रियपणे सहभागी होत असल्याचेही अधोरेखित करण्यात आले.

या संशोधनपर व अनुभवाधारित सादरीकरणास देशभरातून उपस्थित असलेले शिक्षणतज्ज्ञ, संशोधक, प्रशासकीय अधिकारी व शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी यांनी विशेष प्रशंसा केली. ग्रामीण भागातील शाळेने मर्यादित साधनसंपत्तीमध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून राष्ट्रीय पातळीवर आदर्श निर्माण केल्याबद्दल डॉ. गायकवाड आणि जिल्हा परिषद हायस्कूल, आडगाव बु. यांचे कौतुक करण्यात आले.

राष्ट्रीय चर्चासत्रात मार्गदर्शक व प्रमुख वक्ते म्हणून डॉ. प्रकाश मुकुंद (संचालक, MIEPA, छत्रपती संभाजीनगर), डॉ. भावना राजनोर (उपसंचालक, MPSP, मुंबई), डॉ. शैलेजा दराडे (संचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण, छत्रपती संभाजीनगर), श्रीमती रत्नमाला खडके (प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, अकोला), डॉ. विशाल तायडे (प्रमुख, इंग्रजी विभाग, प्रादेशिक विद्या प्राधिकरण, छत्रपती संभाजीनगर), श्री अंकुश ससाने (वरिष्ठ अधिव्याख्याता, DIET, अकोला), प्रा. प्रवीण चव्हाण, डॉ. ज्योती कुलकर्णी, डॉ. रविंद्र जाधव, प्रा. डॉ. सुनिता राठोड व डॉ. गौतम गायकवाड यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

या चर्चासत्रात शैक्षणिक धोरण, शाळा व्यवस्थापन, शिक्षक प्रशिक्षण, नविन शिक्षण पद्धती, डिजिटल शिक्षण व समुदाय सहभाग यावर सखोल चर्चा करण्यात आली. त्यामध्ये आडगाव बु. येथील शाळेचा उपक्रम हा ‘बेस्ट प्रॅक्टिस’ म्हणून अधोरेखित करण्यात आला.

या सादरीकरणाच्या यशस्वीतेमागे स्थानिक पातळीवरील सहकार्य महत्त्वाचे ठरले आहे. यासाठी श्रीमती बकाल (गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती तेल्हारा), प्राचार्य चारुदत्त मेहरे, श्री विलास वानखडे (अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती) आणि श्री किशोर कोल्हे (केंद्रप्रमुख, आडगाव) यांनी मोलाचे सहकार्य व प्रेरणादायी मार्गदर्शन केल्याबद्दल त्यांचे विशेष आभार मानण्यात आले.

ग्रामीण भागातील एका जिल्हा परिषद शाळेने राबविलेल्या समाजाभिमुख, नवोन्मेषी व परिणामकारक शैक्षणिक उपक्रमाची राष्ट्रीय पातळीवर दखल घेतली जाणे ही बाब संपूर्ण अकोला जिल्ह्यासह परिसरासाठी अभिमानास्पद आहे. शाळा आणि समुदाय यांच्यातील सुसंवाद व समन्वयाच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण, समतावादी व सर्वसमावेशक शिक्षणाची दिशा निश्चित करता येते, हे या सादरीकरणातून ठळकपणे समोर आले आहे.

या यशामुळे जिल्हा परिषद शाळांबाबत असलेली पारंपरिक धारणा बदलण्यास मदत होणार असून, इतर शाळांनाही अशा समाजाभिमुख उपक्रमांची प्रेरणा मिळेल, असा विश्वास शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

read also : 

Related News