विजेचा धक्का बसून कामगाराचा मृत्यू, 2 लहान मुलींवर आईची जबाबदारी

विजेचा धक्का

अकोला शहरातील वाशिम बायपासवरील पॉवर हाऊसवर एका 35 वर्षीय कामगाराचा विजेचा धक्का बसून जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृताचे नाव ज्ञानेश्वर रामेश्वर तंबाखे (वय 35, रा. सांगवी मोहाडी) असून ते ठेकेदारी पद्धतीने हेल्पर म्हणून काम करत होते.

माहितीनुसार, ज्ञानेश्वर तंबाखे हे मागील दोन ते तीन वर्षांपासून पॉवर हाऊसवर काम करत होते. शनिवारी (दि. २५ ऑक्टोबर) संध्याकाळी सुमारे पाच वाजताच्या सुमारास इलेक्ट्रिक काम करत असताना चालू लाईनवर काम सुरू असताना त्यांना तीव्र विजेचा शॉक बसला आणि ते जागीच कोसळले. सहकाऱ्यांनी तातडीने त्यांना अकोला शासकीय रुग्णालयात दाखल केले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

Related News

ही घटना जुने शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली असून, पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून प्रकरणाची दखल घेतली आहे.

मृत ज्ञानेश्वर तंबाखे यांच्या मागे पत्नी आणि दोन लहान मुली (४ वर्षांची व २ वर्षांची) आहेत. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असून त्यांच्या वडिलांनी भाजीपाला विक्री करून संसार चालवला आहे. या घटनेने परिसरातील लोकांमध्ये हळहळ निर्माण झाली आहे.

पॉवर हाऊसमधील कामगारांच्या सुरक्षेची नियमावली आणि योग्य खबरदारी याकडे प्रशासनाचे लक्ष वेधणे आवश्यक असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.

read also :  https://ajinkyabharat.com/wp-admin/post.php?post=26960&action=edit&classic-editor

Related News