विदर्भ तलाठी संघ आक्रमक; उद्या अमरावतीत विराट धरणे आंदोलन

तलाठी

यवतमाळ जिल्ह्यातील ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) संवर्गाच्या प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ विदर्भ पटवारी संघाने आंदोलनाची तयारी सुरु केली आहे. या आंदोलनाचा दुसरा टप्पा म्हणून उद्या, १९ जानेवारी २०२६ रोजी अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयासमोर विराट धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.

बुलढाणा जिल्ह्यातून शेकडो आजी-माजी पदाधिकारी व सभासद या आंदोलनात सहभागी होणार आहेत. यवतमाळमध्ये तलाठ्यांचे लॅपटॉप व प्रिंटर निकामी झाले असून कामाचा खोळंबा निर्माण झाला आहे. तसेच कार्यालयांचे भाडे, सेवा ज्येष्ठता याद्या, नैसर्गिक आपत्ती अनुदान यासंबंधी अनेक प्रलंबित मुद्दे अद्याप हाताळलेले नाहीत.

विदर्भ पटवारी संघाचे केंद्रीय अध्यक्ष बाळकृष्ण गाढवे व सरचिटणीस संजय अनव्हाने यांच्या आदेशानुसार, बुलढाणा जिल्हाध्यक्ष विजेंद्र धोंडगे यांच्या नेतृत्वाखाली सर्व उपविभागीय व तालुका पदाधिकारी उद्या अमरावतीकडे कूच करणार आहेत.

जिल्हा सचिव शिवानंद वाकदकर यांनी म्हटले आहे की, “प्रशासनाने लादलेली नियमबाह्य बायोमेट्रिक सक्ती आणि प्रलंबित मागण्यांबाबतचा आडमुठेपणा आता सहन केला जाणार नाही. मागण्या मान्य न झाल्यास हा लढा अधिक तीव्र केला जाईल.”

read also :  https://ajinkyabharat.com/trumps-shocking-trump-greenland-tariff-decision-on-27-european-countries-plan-to-curb-greenland/