युनिटी मार्च/पदयात्रा मूर्तिजापूर येथे उत्साहात संपन्न

युनिटी मार्च

मतभेद–जातपात विसरून एकात्मतेने राष्ट्रनिर्मिती करू या – उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार

मूर्तिजापूर : लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त मूर्तिजापूरमध्ये आयोजित रन फॉर युनिटी’ पदयात्रेला शहरातील विद्यार्थी, युवक, विविध सामाजिक संस्था आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्हाधिकारी कार्यालय, मेरा युवा भारत केंद्र अकोला, उपविभागीय व तहसील कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज सकाळी आठ वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकातून या पदयात्रेची सुरूवात झाली.

उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार यांनी हिरवी झेंडी दाखवत पदयात्रेला प्रारंभ करुन उपस्थित युवकांना राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला. “मतभेद, जात–पात विसरून एकात्मतेने नांदले, तरच राष्ट्र सशक्त आणि आत्मनिर्भर बनेल,” असे प्रतिपादन त्यांनी केले. देशाच्या ऐक्य व अखंडतेसाठी सरदार पटेल यांनी केलेल्या कार्याचा आदर्श ठेवत तरुणांनी पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

या कार्यक्रमाला तहसीलदार शिल्पाताई बोबडे, मेरा युवा भारत केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी महेश सिंह शेखावत यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

Related News

शिवाजी महाराज चौकातून सुरू झालेली पदयात्रा उपजिल्हा रुग्णालय–भगतसिंग चौक–आठवडी बाजार–तहसील कार्यालय मार्गे जात तालुका क्रीडा संकुलात संपन्न झाली. विद्यार्थ्यांनी ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’, ‘सरदार पटेल अमर रहें’ अशा घोषणा देत वातावरण दणाणून सोडले. विविध संदेशफलकांद्वारे राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक ऐक्य, नशामुक्ती आणि आत्मनिर्भर भारताचे संदेश जनतेपर्यंत पोहचविण्यात आले.

क्रीडा संकुलात नशामुक्त भारत, आत्मनिर्भर भारत या शपथा देऊन राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला. तालुका समन्वयक विलास वानखडे (विलास नसले) यांनी घोषणांद्वारे युवकांचा उत्साह अधिक वाढवला.

पदयात्रेमध्ये शासकीय कर्मचारी, विविध शाळांचे प्राचार्य–शिक्षक, क्रीडा व सांस्कृतिक संघटनांचे प्रतिनिधी, पोलीस कर्मचारी, पत्रकार, तसेच एनरजेटिक फिटनेस क्लब, पतंजली योग समिती, फौजी फिजिकल अकॅडमी, जी.के. अकॅडमी, सोल्जर फिटनेस अकॅडमी आदी संस्थांनी सहभाग नोंदवून एकतेचे दर्शन घडवले.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक महेश सिंह शेखावत यांनी केले. संचालन विलास नसले यांनी तर आभार प्रदर्शन ज्ञानेश टाले यांनी केले.

read also : https://ajinkyabharat.com/due-to-7-powerful-secrets-kareena-kapoor-face-mask-44-year-old-has-flawless/

Related News