अत्यंत धोकादायक! पोटाच्या कर्करोगाची ही 5 भयानक लक्षणे अजिबात दुर्लक्ष करू नका

पोटा

अचानक वजन घटतंय? सतत पोटदुखी होत आहे? दुर्लक्ष करू नका, पोटाच्या कर्करोगाचे असू शकतात हे गंभीर संकेत

पोटाच्या कर्करोगाची ही 5 भयानक लक्षणे अजिबात दुर्लक्ष करू नका  :  बदलत्या जीवनशैलीमुळे गेल्या काही वर्षांत अनेक गंभीर आजारांचे प्रमाण झपाट्याने वाढताना दिसत आहे. धावपळीचे जीवन, अनियमित आहार, जंक फूडचे वाढते सेवन, ताणतणाव आणि व्यायामाचा अभाव याचा थेट परिणाम आरोग्यावर होत आहे. याच पार्श्वभूमीवर कर्करोगाच्या रुग्णसंख्येतही मोठी वाढ नोंदवली जात आहे. त्यापैकी एक अत्यंत गंभीर पण अनेकदा दुर्लक्षित राहणारा आजार म्हणजे पोटाचा कर्करोग (Stomach Cancer / Gastric Cancer).

पोटाचा कर्करोग म्हणजे नेमकं काय?

पोटाच्या आतल्या आवरणातील पेशींमध्ये अनियंत्रित वाढ सुरू झाली की पोटाचा कर्करोग होतो. सुरुवातीच्या टप्प्यात या कॅन्सरची लक्षणे अतिशय सौम्य किंवा अस्पष्ट असतात. त्यामुळे अनेक रुग्ण ही लक्षणे सामान्य गॅस, अपचन किंवा आम्लपित्त समजून दुर्लक्ष करतात. यामुळे निदान उशिरा होते आणि तोपर्यंत कॅन्सर प्रगत अवस्थेत पोहोचलेला असतो.

भारतासारख्या देशांमध्ये धोका अधिक का?

जपान, कोरिया यांसारख्या देशांमध्ये पोटाच्या कर्करोगासाठी नियमित स्क्रीनिंग केली जाते. त्यामुळे तिथे हा आजार सुरुवातीच्या टप्प्यातच ओळखला जातो. मात्र भारत, अमेरिका यांसारख्या देशांमध्ये नियमित स्क्रीनिंगची सुविधा किंवा जागरूकता कमी आहे. त्यामुळे बहुतांश रुग्णांना कॅन्सर पोटाबाहेर पसरल्यानंतरच निदान होते, असे American Cancer Society चे म्हणणे आहे.

Related News

कोणती लक्षणे अजिबात दुर्लक्षित करू नयेत?

पोटाच्या कर्करोगाची काही लक्षणे सामान्य आजारांसारखी वाटू शकतात. मात्र ही लक्षणे सतत दिसत असतील, वाढत असतील किंवा कोणत्याही उपचाराने कमी होत नसतील, तर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत गरजेचे आहे.

१. सतत पोट फुगणे किंवा जड वाटणे

जड, तेलकट किंवा मसालेदार जेवणानंतर पोट फुगणे सामान्य आहे. मात्र अगदी कमी प्रमाणात जेवण केल्यानंतरही पोट भरल्यासारखे वाटणे, जडपणा जाणवणे किंवा वरच्या पोटात सतत अस्वस्थता जाणवत असेल, तर हे धोक्याचे लक्षण ठरू शकते.
पोटाच्या कॅन्सरमुळे अन्न पुढे जाण्याची प्रक्रिया मंदावते. त्यामुळे पोटात अन्न साचल्यासारखे वाटते. हे लक्षण जर रोज जाणवत असेल आणि जेवणाच्या प्रकाराशी संबंधित नसेल, तर तपासणी आवश्यक आहे.

२. बिन कारण थकवा आणि कमजोरी

आजकाल धावपळीच्या जीवनामुळे थकवा जाणवणे सामान्य आहे. मात्र पुरेशी झोप, योग्य आहार असूनही सतत थकवा, कमजोरी, अंगात ताकद नसल्यासारखे वाटणे हे गंभीर संकेत असू शकतात.
पोटाच्या कॅन्सरमध्ये अनेकदा हळूहळू अंतर्गत रक्तस्त्राव होतो, जो बाहेरून दिसत नाही. त्यामुळे शरीरात रक्ताची कमतरता (अॅनिमिया) निर्माण होते. यामुळे चक्कर येणे, श्वास लागणे, त्वचा फिकट किंवा पिवळी पडणे अशी लक्षणे दिसू शकतात.

३. अचानक वजन कमी होणे – सर्वात मोठा इशारा

कोणताही डाएट किंवा व्यायाम न करता वजन झपाट्याने कमी होत असेल, तर ते कधीही चांगले लक्षण नसते. पोटाच्या कर्करोगामध्ये रुग्णांना लवकर पोट भरल्यासारखे वाटते. अर्धे जेवण झाल्यावरच भूक संपते.
कॅन्सरमुळे पोटाची क्षमता कमी होते किंवा अन्नाचा मार्ग अडतो. परिणामी शरीराला आवश्यक पोषण मिळत नाही आणि वजन झपाट्याने घटते. अचानक वजन घटणे हे कॅन्सरचे अत्यंत महत्त्वाचे चेतावणीचे लक्षण मानले जाते.

४. वारंवार मळमळ किंवा उलटी

कधीकधी मळमळ येणे सामान्य आहे. मात्र कोणतेही कारण नसताना सतत मळमळ होत राहणे, जेवणानंतर उलटीसारखे वाटणे किंवा सकाळी उठल्यावरच मळमळ जाणवणे हे दुर्लक्ष करण्यासारखे नाही.
पोटाच्या भिंतीवर असलेल्या ट्यूमरमुळे आत जळजळ होते आणि पचनसंस्थेवर परिणाम होतो. त्यामुळे मळमळ, उलटी किंवा कडू पाणी येण्यासारखी लक्षणे दिसतात. ही लक्षणे काही दिवसांपेक्षा जास्त टिकत असतील, तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

५. अपचन आणि आम्लपित्त कायम राहणे

तिखट, तेलकट किंवा जंक फूड खाल्ल्यानंतर अपचन, आम्लपित्त होणे सामान्य आहे. मात्र आहारात बदल करूनही किंवा औषधे घेऊनही जर अपचन, छातीत जळजळ, ओटीपोटात दुखणे कमी होत नसेल, तर हे गंभीर आजाराचे संकेत असू शकतात.
दीर्घकाळ चालणारे अपचन हे पोटाशी संबंधित कर्करोगाचे सुरुवातीचे लक्षणही ठरू शकते.

पोटाच्या कर्करोगाचे धोके कोणाला अधिक?

  • ५० वर्षांवरील व्यक्ती

  • धूम्रपान आणि मद्यपान करणारे

  • जास्त मीठ, लोणची, प्रक्रिया केलेले अन्न खाणारे

  • Helicobacter pylori संसर्ग असलेले

  • कुटुंबात कर्करोगाचा इतिहास असलेले

वेळेवर तपासणीच जीव वाचवू शकते

पोटाचा कर्करोग सुरुवातीच्या टप्प्यात ओळखला गेला तर त्यावर उपचार शक्य आहेत. एंडोस्कोपी, बायोप्सी, रक्ततपासणी, सीटी स्कॅन यांसारख्या चाचण्यांमुळे आजाराचे निदान करता येते. त्यामुळे वरीलपैकी कोणतेही लक्षण सातत्याने दिसत असेल, तर “गॅस आहे” किंवा “अपचन आहे” असे म्हणून दुर्लक्ष करू नका.

आरोग्याच्या बाबतीत जागरूक राहणे हीच खरी शहाणपणाची गोष्ट आहे. अचानक वजन कमी होणे, सतत पोटदुखी, अपचन, मळमळ किंवा थकवा ही शरीराने दिलेली इशार्‍याची घंटा असू शकते. वेळेवर डॉक्टरांकडे जाणे आणि तपासणी करून घेणे यामुळे गंभीर परिणाम टाळता येऊ शकतात.
लक्षात ठेवा – लवकर निदान म्हणजेच जीवदान.

Related News