आकोट | प्रतिनिधी
आकोट शहराच्या राजकीय व प्रशासकीय जीवनातील महत्त्वाचा क्षण ठरलेल्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ. मायाताई विवेकराव धुळे यांच्या पदग्रहण सोहळ्याचे गुरुवार, दि. १ जानेवारी रोजी आकोट नगरपरिषद प्रांगणात मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले. या सोहळ्याला शहरातील विविध राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, नवनिर्वाचित नगरसेवक तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार प्रकाश भारसाकळे होते, तर अकोल्याचे खासदार अनुप धोत्रे यांची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय आमदार वसंत खंडेवाल, भाजप जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकार, भाजप जिल्हा सरचिटणीस माधवराव मानकर, ग्रामीण जिल्हा सरचिटणीस राजेश नागमते, ग्रामीण जिल्हा सरचिटणीस सौ. रुपालीताई काकडे, माजी नगराध्यक्ष हरिनारायण माकोडे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
Related News
पदग्रहण सोहळ्याची सुरुवात आकोट नगरपरिषद सभागृहात मान्यवरांच्या हस्ते थोर महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर नगराध्यक्ष दालनात खासदार अनुप धोत्रे, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार वसंत खंडेवाल व मुख्याधिकारी शशिकांत बाबर यांच्या हस्ते नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ. मायाताई धुळे यांचा सत्कार करण्यात आला.

नगरपरिषद प्रांगणात झालेल्या मुख्य कार्यक्रमात बोलताना खासदार अनुप धोत्रे यांनी आकोट शहराच्या विस्तारित भागात मूलभूत सुविधा, नवीन रस्ते, विविध विकासकामे आमदार प्रकाश भारसाकळे यांच्या नेतृत्वाखाली लवकरच पूर्णत्वास जातील, असा विश्वास व्यक्त केला. तसेच शहराच्या बायपास प्रस्तावालाही लवकरच मंजुरी मिळून तो मार्गी लागेल, असे त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय भाषणात आमदार प्रकाश भारसाकळे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘सबका साथ, सबका विकास’ या धोरणानुसार आकोट शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले. नगरपरिषदेच्या माध्यमातून पायाभूत सुविधा, नागरी सोयी-सुविधा आणि विकासकामांना गती देण्यात येईल, असे त्यांनी नमूद केले.

यावेळी मनोगत व्यक्त करताना नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ. मायाताई धुळे यांनी शहरवासीयांच्या आशीर्वादामुळेच आपल्याला नगराध्यक्षा होण्याची संधी मिळाल्याचे सांगितले. सेवा, पारदर्शकता, नीतिमत्ता आणि समाजातील सर्व घटकांसाठी वचनबद्धता या मूल्यांवर आधारित कार्य करणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. संविधानाच्या मूल्यांचे पालन करत स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण संरक्षण आणि डिजिटल सुरक्षितता या क्षेत्रांमध्ये ठोस व प्रभावी निर्णय घेण्याचा आपला नेहमीच प्रयत्न राहील, असेही त्यांनी सांगितले. शहरातील सर्व समाजघटकांच्या समस्या समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले जातील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी नगराध्यक्ष पुरुषोत्तम चौखंडे यांनी केले, तर सूत्रसंचालन माजी नगरसेवक मंगेश लोणकर यांनी केले. मंचावर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शशिकांत बाबर, भाजप तालुकाध्यक्ष गोपाल मोहोड, भाजप शहराध्यक्ष हरिष टावरी, राजेश रावणकर, संतोष झुनझुनवाला यांच्यासह शिवसेना (उबाठा) गटाचे उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे, प्रहार जनशक्ती पक्षाचे सुशिल पुंडकर, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) जिल्हाध्यक्ष मो. बद्रुजमा, शिवसेना शिंदे गटाचे डॉ. विशाल इंगोले आदी मान्यवर उपस्थित होते.
या पदग्रहण सोहळ्यामुळे आकोट शहराच्या विकासाबाबत नव्या अपेक्षा निर्माण झाल्या असून, आगामी काळात शहराच्या सर्वांगीण प्रगतीला नवी दिशा मिळेल, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे.
