राज्यातील सर्वात मोठी ‘राजमाता जिजाऊ बॉक्सिंग चॅम्पियनशिप’

राजमाता जिजाऊ बॉक्सिंग

महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग असोसिएशन व बुलढाणा जिल्हा बॉक्सिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील सर्वात भव्य व प्रतिष्ठेची राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धा — ‘राजमाता जिजाऊ बॉक्सिंग चॅम्पियनशिप २०२५’ — शेगाव येथे ९ ते १४ डिसेंबर २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. वरिष्ठ पुरुष, युवक आणि महिला गटातील राज्यभरातील नामवंत तसेच उदयोन्मुख बॉक्सर या स्पर्धेत सहभागी होणार असून जवळपास ८०० हून अधिक खेळाडू विविध वजनगटांमध्ये आपले कौशल्य पणाला लावणार आहेत.

मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धा होणार असल्याने संपूर्ण जिल्ह्यात क्रीडामय वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचे नवनिर्वाचित कार्याध्यक्ष मा. विठ्ठलराव लोखंडकर यांच्या विशेष प्रयत्नांतून आणि बुलढाणा जिल्हा बॉक्सिंग असोसिएशनच्या नियोजनातून हा मान जिल्ह्याला मिळाल्याची माहिती आयोजकांनी दिली. ग्रामीण भागातील खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध व्हावे तसेच बॉक्सिंगसारख्या खेळाला चालना मिळावी, हा या आयोजनामागील मुख्य उद्देश आहे.

स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यासाठी राज्याचे क्रीडामंत्री, केंद्र व राज्यातील मान्यवर मंत्री, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, आमदार, खासदार, क्रीडा अधिकारी तसेच देशातील नामांकित बॉक्सिंग प्रशिक्षक, पंच व खेळतज्ज्ञ उपस्थित राहणार आहेत. दररोज सकाळी व दुपारी प्राथमिक फेऱ्या तर सायंकाळी उपांत्य व अंतिम सामने रंगणार असून प्रेक्षकांसाठी मोफत प्रवेश ठेवण्यात आला आहे.

Related News

स्पर्धेचे संपूर्ण कव्हरेज करण्यासाठी राज्यातील प्रमुख इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मीडिया प्रतिनिधी शेगावात दाखल होणार आहेत. त्याचबरोबर हजारो खेळाडू, प्रशिक्षक, पालक व क्रीडाप्रेमींची उपस्थिती अपेक्षित असल्याने शेगाव शहरात मोठी वर्दळ व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक प्रशासनाकडून वाहतूक, सुरक्षा, निवास, वैद्यकीय सुविधा तसेच भोजन व्यवस्थेसाठी विशेष तयारी करण्यात आली आहे.

ही स्पर्धा केवळ खेळाची मैफल न राहता बुलढाणा जिल्ह्याच्या क्रीडा विकासाला चालना देणारा ऐतिहासिक क्षण ठरणार असल्याचे मत क्रीडाप्रेमींमध्ये व्यक्त होत आहे. शेगावच्या भूमीत होणाऱ्या या राज्यस्तरीय महास्पर्धेमुळे लहान शहरातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे बॉक्सर घडवण्याची प्रेरणा निश्चितच मिळणार आहे.

read also : https://ajinkyabharat.com/tight-security-arrangements-in-murtijapur-strong-room/

Related News