भंडारज बु. जलजीवन योजनेत भ्रष्टाचार; ग्रामस्थांचा घागर मोर्चा

भंडारज बु. जलजीवन योजनेत भ्रष्टाचार; ग्रामस्थांचा घागर मोर्चा

अकोला – पातूर तालुक्यातील भंडारज बु. येथे जलजीवन मिशन अंतर्गत मंजूर पाणीपुरवठा योजनेत

झालेल्या कथित भ्रष्टाचारामुळे ग्रामस्थांना आजही पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

पाण्याच्या तुटवड्याने त्रस्त झालेल्या महिला व ग्रामस्थांनी शनिवारी जिल्हा परिषद अकोला येथे घागर मोर्चा काढून तक्रार दाखल केली.

माहितीनुसार, २०२२ साली या गावासाठी पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली होती. पाणीपुरवठा विभागाच्या अहवालानुसार, कंत्राटदाराने रेट्रोफिटींगचे ९८ टक्के काम पूर्ण केल्याचे दाखवले असून, यावर तब्बल ४८.७३ लाख रुपये खर्च झाल्याची नोंद आहे. मात्र, प्रत्यक्षात काम निकृष्ट असून योजना केवळ कागदावरच राबवली गेल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.

गावातील नळ कोरडे पडल्याने नागरिकांना पाण्यासाठी इतरत्र फिरावे लागत आहे. “आम्हाला तात्काळ शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू,” असा इशारा ग्रामस्थांनी दिला. प्रशासनाने याप्रकरणी चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली.

Read Also :https://ajinkyabharat.com/rahul-gandhanchaya-banditrach-pawar-sahebana-evmchi-athavan-fadnavisanchi-vaccine/