अकोट तालुक्यातील उमरा गावात एका चवताळलेल्या माकडाने मागील दहा दिवसांपासून धुमाकूळ घातला असून आतापर्यंत तीन जणांना चावा घेऊन जखमी केले आहे. सुरुवातीला लीलाबाई रेखाते यांच्यावर हल्ला केल्यानंतर आठ दिवसांपूर्वी प्रमोद मोडशे यांच्या पाठीवर चावा घेतला. गंभीर जखमी झालेल्या मोडशे यांच्यावर अकोट येथील शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी अकोला येथे रेफर करण्यात आले. त्यानंतर आणखी एका नागरिकावर हल्ला झाल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
माकडाच्या सततच्या हल्ल्यांमुळे महिला, शाळकरी मुले, वृद्ध आणि नागरिक घराबाहेर पडण्यास घाबरत आहेत. ग्रामस्थांनी अनेकदा वनविभागाला माहिती देऊनही अद्याप माकडाला पकडण्यात आले नसल्याचा आरोप केला आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी वनविभागाने तातडीने विशेष पथक पाठवून चवताळलेल्या माकडाला पकडावे, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली आहे. अन्यथा आणखी मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
