SBIचा मोठा निर्णय! 12 हजार कर्मचाऱ्यांची होणार भरती; 250 नव्या शाखाही उभारणार

2

देशातील सर्वात मोठी बँक 12हजार कर्मचारी भरणार; 250  नव्या शाखा उभारणार

बेरोजगार तरुणांसाठी मोठी संधी; क्लेरिकल आणि ऑफिसर कॅडरमध्ये होणार भरती

देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने मोठ्या प्रमाणात कर्मचारी भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. एकीकडे देशात बेरोजगारीचा प्रश्न गंभीर होत असताना, एसबीआयकडून तब्बल 11 ते १२ हजार कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार असल्याने नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी ही महत्त्वाची बातमी मानली जात आहे. विशेष म्हणजे, कर्मचारी भरतीसोबतच चालू आर्थिक वर्षात बँकेचे नेटवर्क वाढविण्यासाठी सुमारे 250 नव्या शाखा सुरू करण्याचे नियोजनही करण्यात आले आहे.

एसबीआयचे चेअरमन सी. एस. शेट्टी यांनी पीटीआयशी संवाद साधताना बँकेच्या आगामी कर्मचारी भरतीबाबत माहिती दिली. त्यांच्या माहितीनुसार, चालू आर्थिक वर्षात क्लेरिकल आणि ऑफिसर कॅडरमध्ये मिळून सुमारे 11 ते 12हजार कर्मचाऱ्यांची भरती करण्याचे बँकेचे नियोजन आहे. निवृत्ती तसेच भविष्यात निर्माण होणाऱ्या मनुष्यबळाच्या गरजेनुसार ही संख्या काही प्रमाणात बदलू शकते. मात्र, आर्थिक वर्षाच्या अखेरीस सुमारे 12 हजार कर्मचाऱ्यांची भरती पूर्ण होईल, अशी अपेक्षा शेट्टी यांनी व्यक्त केली आहे.

क्लेरिकल आणि ऑफिसर कॅडरमध्ये मोठी भरती

एसबीआयच्या या निर्णयामुळे बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. यामध्ये प्रामुख्याने क्लेरिकल आणि ऑफिसर कॅडरमधील पदांचा समावेश असेल. बँकेच्या वाढत्या कामकाजासोबतच निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे निर्माण होणाऱ्या रिक्त जागा भरून काढण्यासाठीही ही भरती महत्त्वाची ठरणार आहे.

Related News

एसबीआयने यापूर्वीही मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची भरती केली आहे. मागील आर्थिक वर्षात बँकेने तब्बल २५ हजार ६३३ कर्मचाऱ्यांना नोकरी दिली. बँकेच्या वार्षिक अहवालानुसार, यामध्ये ४,६४० अधिकारी, १९,३४० सहायक अधिकारी आणि १,६५३ कंत्राटी कर्मचारी यांचा समावेश होता.

मागील वर्षी1,500 स्पेशलिस्ट IT अधिकाऱ्यांची भरती

एसबीआयने मागील वर्षी तंत्रज्ञान आणि डिजिटल बँकिंगच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन मोठ्या प्रमाणावर आयटी क्षेत्रातील मनुष्यबळाची भरती केली होती. यामध्ये सुमारे १,५०० स्पेशलिस्ट आयटी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.

मात्र, यंदा मागील वर्षाच्या तुलनेत एवढ्या मोठ्या प्रमाणावर आयटी कर्मचाऱ्यांची गरज नसल्याचे सी. एस. शेट्टी यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे यंदाच्या भरतीमध्ये पारंपरिक बँकिंग कामकाजासाठी आवश्यक असलेल्या क्लेरिकल आणि ऑफिसर कॅडरवर अधिक भर राहण्याची शक्यता आहे.

मार्च 2026 अखेर २.४५ लाख कर्मचाऱ्यांचा वर्कफोर्स

एसबीआयचा कर्मचारी वर्ग आधीच मोठ्या प्रमाणावर आहे. मार्च २०२६ अखेर बँकेकडे सुमारे २.४५ लाख कर्मचाऱ्यांचा वर्कफोर्स होता. देशभरात मोठे शाखा नेटवर्क आणि ग्राहकसंख्या असलेल्या एसबीआयला विविध भागांमध्ये मनुष्यबळाची आवश्यकता सातत्याने भासत आहे.

देशातील सर्वाधिक रोजगार देणाऱ्या संस्थांपैकी एसबीआय ही एक महत्त्वाची संस्था ठरली आहे. बँकेच्या मोठ्या प्रमाणातील भरतीमुळे बँकिंग क्षेत्रात रोजगाराच्या संधी वाढण्यास मदत होणार आहे.

250 नव्या शाखांचे नेटवर्क उभारण्याचे लक्ष्य

कर्मचारी भरतीसोबतच एसबीआयने शाखा विस्तारावरही भर देण्याचे ठरवले आहे. चालू आर्थिक वर्षात सुमारे २५० नव्या शाखांचे नेटवर्क उभारण्याचे बँकेचे उद्दिष्ट असल्याचे सी. एस. शेट्टी यांनी सांगितले.

एसबीआयचे देशभरात आधीच मोठे शाखा नेटवर्क आहे. मात्र, वाढत्या लोकसंख्येबरोबरच नवीन वसाहती आणि व्यावसायिकदृष्ट्या सक्रिय भागांचा विकास होत असल्याने अशा ठिकाणी बँकेच्या शाखांची गरज निर्माण होत आहे. ग्राहकांच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन या भागांमध्ये बँकेचा विस्तार करण्यात येणार आहे.

शाखांचे रॅशनलायझेशनही होणार

बँकेकडून केवळ नव्या शाखा सुरू करण्यावरच भर दिला जाणार नसून, विद्यमान शाखांचे रॅशनलायझेशन करण्याचाही विचार केला जात आहे. म्हणजेच, ग्राहकसंख्या, व्यवहार, स्थानिक गरज आणि व्यावसायिक व्यवहार्यता यांचा विचार करून शाखांच्या नेटवर्कचे अधिक प्रभावी नियोजन केले जाणार आहे.

यामुळे काही ठिकाणी शाखांची पुनर्रचना किंवा योग्य ठिकाणी मनुष्यबळाचे पुनर्वाटप होऊ शकते. नव्या भागांमध्ये शाखा सुरू करण्यासाठी आणि विद्यमान नेटवर्क अधिक कार्यक्षम करण्यासाठी अतिरिक्त कर्मचाऱ्यांची गरज भासणार आहे.

बेरोजगार तरुणांसाठी महत्त्वाची संधी

एसबीआयच्या या भरतीमुळे बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळवू इच्छिणाऱ्या तरुणांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. विशेषतः सरकारी बँकेतील नोकरीसाठी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही भरती महत्त्वाची ठरू शकते.

दरम्यान, भरती प्रक्रियेतील पदांची अचूक संख्या, पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा पद्धती, अर्जाची तारीख आणि अधिकृत अधिसूचना एसबीआयकडून स्वतंत्रपणे जाहीर केली जाईल. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी अधिकृत भरती अधिसूचनेकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

एसबीआयच्या कर्मचारी भरतीसोबतच शाखा विस्ताराच्या निर्णयामुळे बँकेचे देशभरातील नेटवर्क आणखी मजबूत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकीकडे ग्राहकांना अधिक बँकिंग सुविधा उपलब्ध होणार असून, दुसरीकडे हजारो तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे.

 

Read Also : 

Related News