K. Rajan यांच्या निधनाने तमिळ चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील स्पष्टवक्ते, वादग्रस्त आणि प्रभावी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख असलेल्या के. राजन यांनी चेन्नईतील अड्यार परिसरातील पुलावरून नदीत उडी मारून जीवन संपवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ते 85 वर्षांचे होते. या घटनेनंतर संपूर्ण मनोरंजन विश्वात हळहळ व्यक्त केली जात असून पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
“थोडं फिरून येतो…” आणि काही क्षणांत घडली दुर्दैवी घटना
मिळालेल्या माहितीनुसार, के. राजन हे रविवारी रात्री वॉशरमॅनपेट भागातून कारने बाहेर पडले होते. त्यांच्यासोबत त्यांचा ड्रायव्हरही होता. अड्यार नदीजवळील पुलावर पोहोचल्यानंतर त्यांनी अचानक गाडी थांबवण्यास सांगितले. “जरा फिरून येतो,” असे सांगून ते गाडीतून उतरले आणि पुलाच्या दिशेने चालत गेले. काही क्षणांतच त्यांनी पुलावरून नदीत उडी घेतल्याचं सांगितलं जात आहे.
घटना इतक्या वेगाने घडली की ड्रायव्हरलाही काही समजण्याआधीच सर्व संपलं होतं. ड्रायव्हरने तातडीने मदतीसाठी आरडाओरडा केला आणि पोलिसांसह अग्निशमन विभागाला माहिती दिली. बचाव पथकाने तत्काळ शोधमोहीम सुरू केली, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. काही वेळाने त्यांचा मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आला.
Related News
पोलिसांकडून तपास सुरू
या प्रकरणाचा तपास सध्या चेन्नई पोलीस करत आहेत. आत्महत्येमागचं नेमकं कारण काय, याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. विशेष म्हणजे, गेल्या काही काळापासून के. राजन हे कुटुंबीयांपासून वेगळे राहत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मानसिक तणाव, एकटेपणा किंवा इतर काही वैयक्तिक कारणांमुळे त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं का, याचा तपास सुरू आहे.
पोलीस त्यांच्या ड्रायव्हरची चौकशी करत असून, घटनेआधी त्यांनी कोणाशी संवाद साधला होता का, त्यांची मानसिक अवस्था कशी होती, यासंदर्भातील माहिती गोळा केली जात आहे. त्यांच्या मोबाईल कॉल रेकॉर्ड्स आणि जवळच्या CCTV फुटेजचीही तपासणी केली जात असल्याचं समोर येत आहे.
तमिळ चित्रपटसृष्टीतील प्रभावी व्यक्तिमत्त्व
K. Rajan हे तमिळ चित्रपटसृष्टीतील अत्यंत प्रभावी नाव मानलं जात होतं. त्यांनी 1983 मध्ये ‘ब्रह्मचारिगल’ या चित्रपटाद्वारे निर्माता म्हणून कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शन केलं. केवळ निर्माते किंवा दिग्दर्शक म्हणूनच नव्हे, तर अभिनेते म्हणूनही त्यांनी काम केलं होतं.
चित्रपटसृष्टीतील आर्थिक प्रश्न, निर्मात्यांच्या अडचणी आणि कलाकारांच्या वाढत्या मानधनावर ते सातत्याने भाष्य करत असत. उद्योगातील समस्यांवर स्पष्ट भूमिका घेणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख होती. अनेकदा चित्रपटसृष्टीत वाद निर्माण झाल्यानंतर मध्यस्थी करण्याची भूमिकाही त्यांनी निभावली होती.
स्पष्टवक्तेपणामुळे कायम चर्चेत
के. राजन हे त्यांच्या बेधडक वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असायचे. कोणत्याही मोठ्या कलाकाराचं नाव घेण्यास ते कधीही घाबरत नसत. त्यांनी अनेकदा मोठ्या बजेटच्या चित्रपटांवर टीका केली होती. अशा चित्रपटांमुळे निर्मात्यांवर कर्जाचा डोंगर उभा राहतो, असं त्यांचं स्पष्ट मत होतं.
विशेषतः कार्तीच्या ‘आयिरथिल ओरुवन’ आणि धनुषच्या ‘एनाई नोकी पायूम थोटा’ या चित्रपटांचा उल्लेख करत त्यांनी हे सिनेमे अवाजवी खर्चिक ठरल्याचं म्हटलं होतं. त्यांच्या मते, मोठ्या कलाकारांच्या मानधनामुळे आणि प्रायोगिक चित्रपटांवरील खर्चामुळे अनेक निर्माते आर्थिक संकटात सापडतात.
नयनताराच्या मानधनावरही केली होती टीका
Nayanthara हिच्या कोट्यवधी रुपयांच्या मानधनावरही के. राजन यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. कलाकार मोठमोठं मानधन घेतात, पण चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पुढे येत नाहीत, अशी टीका त्यांनी केली होती. ऑडिओ लॉन्च, पत्रकार परिषद किंवा प्रमोशनल कार्यक्रमांपासून कलाकार दूर राहतात, यामुळे निर्मात्यांना फटका बसतो, असं त्यांचं म्हणणं होतं.
त्यांच्या या स्पष्ट वक्तव्यांमुळे अनेकदा सोशल मीडियावर वाद निर्माण झाले होते. मात्र, तरीही ते आपली भूमिका ठामपणे मांडत असत.
सिनेसृष्टीतून हळहळ व्यक्त
के. राजन यांच्या निधनानंतर तमिळ चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार, निर्माते आणि दिग्दर्शकांनी शोक व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर अनेकांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. उद्योगातील संघर्ष करणाऱ्या निर्मात्यांसाठी आवाज उठवणारा एक प्रभावी चेहरा हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
त्यांच्या निधनामुळे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील एक स्पष्टवक्ते आणि अनुभवी व्यक्तिमत्त्व कायमचं हरपल्याचं मानलं जात आहे.
read also : https://ajinkyabharat.com/garh-jhopet-asantaach-train-huge-fire/
