CJP ला प्रकाश राज, शबाना आझमी यांचा भक्कम पाठिंबा; जंतरमंतरवर पोहोचून आंदोलनाला दिला पाठिंबा, ‘आज रात्री मी तुमच्यासोबतच आहे…’
राजधानी दिल्लीतील जंतरमंतर येथे कॉकरोच जनता पार्टी (CJP) च्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाला आता देशभरातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा पाठिंबा मिळू लागला आहे. शिक्षण व्यवस्थेतील कथित त्रुटी, नीट (NEET) परीक्षेतील पेपरफुटी प्रकरण आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या या आंदोलनात रविवारी अभिनेते प्रकाश राज, ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी, अभिनेत्री पूनम पांडे तसेच आम आदमी पक्षाचे वरिष्ठ नेते मनीष सिसोदिया यांनी उपस्थित राहून आंदोलनकर्त्यांना समर्थन दिले. या सर्वांच्या उपस्थितीमुळे जंतरमंतरवरील आंदोलनाला नवसंजीवनी मिळाल्याचे चित्र दिसून आले.
दरम्यान, आज (20 जुलै) जंतरमंतर ते संसद असा मोर्चा काढण्याची तयारी CJP कडून करण्यात आली आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा मोर्चा काढण्यात येणार असल्याने दिल्लीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. जंतरमंतर परिसरात सकाळपासूनच आंदोलनकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळत असून, दिवस जसजसा पुढे सरकेल तसतशी ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलन तीव्र
संसदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होत असून ते 13 ऑगस्ट 2026 पर्यंत चालणार आहे. याच पार्श्वभूमीवर CJP ने “चलो संसद” या आंदोलनाची घोषणा केली आहे. विद्यार्थ्यांचे प्रश्न, नीट पेपरफुटी प्रकरणाची चौकशी, शिक्षण व्यवस्थेतील सुधारणा आणि केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात येणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.
Related News
आंदोलनस्थळी देशभरातून विद्यार्थी, पालक, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी दाखल होत आहेत. त्यामुळे दिल्ली पोलिसांनी जंतरमंतर परिसरात सुरक्षा व्यवस्थाही वाढवली आहे.
प्रकाश राज यांचे आंदोलनाला जाहीर समर्थन
प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांनी दुसऱ्यांदा जंतरमंतरवर हजेरी लावत आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला. त्यांनी CJP विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत सरकारने तरुणांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे सांगितले.
यावेळी भाषण करताना प्रकाश राज म्हणाले, “आज रात्री मी तुमच्यासोबतच आहे. मी इथेच थांबणार आहे. पुढे काय घडतं ते आपण सर्व पाहू.” त्यांच्या या वक्तव्याला आंदोलनकर्त्यांनी जोरदार प्रतिसाद दिला.
यानंतर त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओही शेअर केला. त्यामध्ये त्यांनी म्हटले की, “आज आपल्या देशातील तरुण प्रश्न विचारत आहे. हे विद्यार्थी कोणत्याही राजकीय हेतूसाठी नाही, तर आपल्या भविष्याच्या लढ्यासाठी एकत्र आले आहेत. त्यांच्या आवाजाकडे दुर्लक्ष करता येणार नाही.”
प्रकाश राज यांच्या या भूमिकेची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली आहे.
शबाना आझमी यांनीही दिले समर्थन
ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनीही जंतरमंतरवर उपस्थित राहून आंदोलनकर्त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांनी मंचावरून विद्यार्थ्यांना आणि आंदोलनात सहभागी झालेल्यांना अभिवादन केले.
CJP च्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर शबाना आझमी यांचा व्हिडीओही शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये त्या आंदोलनकर्त्यांशी संवाद साधताना दिसतात. त्यांनी शांततामय आंदोलनाचे कौतुक करत विद्यार्थ्यांचा आवाज ऐकला जावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
त्यांच्यासोबत उपस्थित असलेले प्रकाश राज यांनी अनेक विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना धीर दिला. काही विद्यार्थ्यांच्या डोक्यावर हात ठेवून त्यांनी त्यांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला.
पूनम पांडेचाही सहभाग
अभिनेत्री पूनम पांडे हिने देखील आंदोलनाला समर्थन दिले. माध्यमांशी बोलताना ती म्हणाली, “मला राजकारणाबद्दल फारशी माहिती नाही. पण हा विषय विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित आहे. हा कोणत्याही पक्षाचा किंवा धर्माचा प्रश्न नसून शिक्षणाचा मुद्दा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना न्याय मिळायला हवा.”
तिने यावेळी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या भूमिकेलाही समर्थन व्यक्त केले.
मनीष सिसोदिया यांची उपस्थिती
दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री आणि माजी शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया यांनी देखील जंतरमंतरवर भेट देत आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. त्यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत सरकारने सकारात्मक भूमिका घ्यावी, असे मत व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे.
त्यांच्या उपस्थितीमुळे आंदोलनाला राजकीय रंग मिळाल्याची चर्चा सुरू असली, तरी आयोजकांनी हे आंदोलन विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी असल्याचा दावा कायम ठेवला आहे.
सोनम वांगचुक रुग्णालयात, तरी आंदोलन सुरूच
दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक हे 28 जूनपासून आमरण उपोषणावर आहेत. प्रकृती खालावल्याने न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर दिल्ली पोलिसांनी त्यांना जंतरमंतरवरून हलवून सफदरजंग रुग्णालयात दाखल केले.
सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. मात्र, वांगचुक रुग्णालयात असतानाही आंदोलन सुरूच आहे. त्यांच्या समर्थकांनी जंतरमंतरवरील आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
CJP ची प्रमुख मागणी काय?
कॉकरोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनामागे काही प्रमुख मागण्या आहेत. त्यामध्ये नीट पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी, शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकता, विद्यार्थ्यांना न्याय आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी यांचा समावेश आहे.
आयोजकांच्या म्हणण्यानुसार, विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित प्रश्न निकाली निघेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार आहे. संसद अधिवेशनाच्या काळात हे आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सरकारची भूमिका महत्त्वाची
CJP जंतरमंतरवरील आंदोलनाला आता चित्रपटसृष्टीतील कलाकार, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध राजकीय नेत्यांचा पाठिंबा मिळत असल्याने या आंदोलनाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. सरकार आंदोलनकर्त्यांशी चर्चा करणार की कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने कठोर भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
संसद अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी प्रस्तावित “चलो संसद” मोर्चामुळे दिल्लीतील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत सरकार आणि आंदोलनकर्त्यांमध्ये कोणती भूमिका घेतली जाते, यावर संपूर्ण घडामोडी अवलंबून असणार आहेत.
