रोहित पवार भावूक: अजित पवार यांच्या निधनाबद्दल शोक प्रस्तावावर सभागृहात उभे राहून केले भावपूर्ण भाष्य
महाराष्ट्राच्या राजकारणातील अत्यंत भावनिक आणि ऐतिहासिक प्रसंग घडला, जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दल सभागृहात शोक प्रस्तावावर बोलताना भावूकतेला रोखू शकले नाही. सभागृहाच्या शांत वातावरणात रोहित पवारांनी आपल्या काकू आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना देखील भरभरून शब्द दिले.
सभागृहात सुरुवात करताना रोहित पवार म्हणाले, “अध्यक्ष महोदय, माझे अजित काका, महाराष्ट्राचे अजित दादा, विकासाचे अजित दादा, आजचा हा प्रसंग माझ्यासाठी आणि सर्वांनाच प्रचंड भावनिक आहे. शरद पवार यांच्या बरोबर ज्यांच्याकडे बघून आम्ही राजकारणात प्रेरणा घेतली तो आमचा अभिमान, स्वाभिमान, आमचे आधार, माझे काका आणि महाराष्ट्राचे अजित दादा, ज्यांच्या शोक प्रस्तावावर बोलण्यास आज मी या ठिकाणी उभा आहे.”
रोहित पवारांनी त्यांच्या भाषणात अजित पवारांच्या वैयक्तिक आणि राजकीय जीवनाची आठवण करून दिली. ते म्हणाले की, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज हा शोक प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला मी पाठिंबा देतो. 66 वर्षे 6 महिने आणि 6 दिवस असा अजित दादांचा प्रवास, पायाखालची जमीन सरकणे काय असते ते 28 जानेवारीला आम्ही सर्वांनी अनुभवलं. अजित दादांचं कार्य हे 40 वर्षांपेक्षा जास्त आहे. माझं वय 40 आहे, माझ्या वयापेक्षा जास्त अनुभव अजित काकांचा राजकारणात होता. या सगळ्या गोष्टींबद्दल बोलणं काही मिनिटांत सोपं नाही. कितीही पानं वाचली तरी त्यांचा राजकीय प्रवास, सामाजिक कामे जेवढं बोलेल तेवढं कमी आहे.”
Related News
त्यांनी अजित पवारांसोबतच्या आठवणींना उजाळा दिला. रोहित पवार म्हणाले, “1982 मध्ये ते छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून निवडून आले. त्यावेळेस सुरु झालेला प्रवास हा 2026 पर्यंत राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून काही काळ अजून मिळाला असता, काही वर्षे त्यांना मिळाले असते तर राज्याचं प्रमुख राजकीय स्थान म्हणजे मुख्यमंत्री सुद्धा अजित दादा झाले असते हा आम्हाला विश्वास आहे.”
रोहित पवार यांनी अजित पवारांच्या शारीरिक आणि राजकीय सल्ल्यांचेही स्मरण केले. त्यांनी सांगितले, “अजित काकांनी मला एकदा शारीरिक वजन कमी करण्याचा सल्ला दिला होता, त्याचवेळी मला राजकीय वजन वाढवण्याचा सल्लाही दिला होता.” या भावनिक प्रसंगात सभागृहातील सर्व उपस्थितांचे डोळे पाणावले.
त्याचबरोबर रोहित पवार यांनी अजित पवारांच्या कार्यशैलीचे स्मरण केले. ते म्हणाले, “या विधानसभेत आल्यानंतर अजूनसुद्धा अजित दादा कुठे बसले आहेत, आमच्याकडे लक्ष ठेवून असतील. अधिवेशनात येत असताना अजूनही आपल्याला आठवत असेल, त्यांची कपडे घालण्याची स्टाईल, कधीतरी गॉगल घालणं, आमदारांचा घोळका, कार्यकर्त्यांचा घोळका. मीडिया बरोबर मी बोलत असेल तर मागून मिश्किलपणे टोमणा मारणं. अधिवेशनात बसल्याबरोबर कोण काय बोलतंय, शांतपणे काय चाललंय हे बारकाईने बघणं.”
रोहित पवार म्हणाले की, “मध्येच कुणी अडवलं, थांबलं किंवा खूप आवाज केला तर मिश्किलपणे बोलून जायचे, जास्त आवाज केला तर तू मंत्री होणार नाही याची देखील काळजी घेतली जाते. शरद पवारांबद्दल चुकून कुणी बोललं तर सभागृहावर डोक्यावर घेताना बघितलं जात असे. या सभागृहात येणारा पहिला नेता कोण असेल तर अजित दादा असायचे, आणि सभागृहाचे कामकाज संपल्यानंतर सर्वात शेवटी जाणारे नेता देखील अजित दादा असायचे.”
रोहित पवार यांनी अजित पवारांच्या विमान अपघाताच्या घटनेत दोषींवर कठोर कारवाई होण्याचीही मागणी केली. ते म्हणाले, “अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या घटनेत दोषी असणाऱ्यांना तुरुंगात पाठवल्याशिवाय किंवा शिक्षा केल्याशिवाय आपण शांत बसणार नाही.”
सभागृहात सुनेत्रा पवार यांना शब्द देताना रोहित पवार म्हणाले, “मला काकींना सांगायचं आहे. काकी, तुमच्या पुढच्या राजकीय प्रवासामध्ये या छोट्या कार्यकर्त्यांचं, तुमच्या पुतण्याला जिथे कुठे मदत लागेल तिथे मी तयार असेन. जेवढं बोलेन तेवढं कमी आहे. काकांच्या विचारांवर आणि काकांच्या स्टाईलने नक्कीच काम करत राहीन. धन्यवाद. रामकृष्ण हरी.”
रोहित पवार यांच्या या भाषणातून त्यांच्या भावनांचे आणि अजित पवार यांच्या राजकीय योगदानाचे महत्त्व अधोरेखित झाले. सभागृहातील उपस्थितांसाठी हा प्रसंग अत्यंत भावनिक आणि ऐतिहासिक ठरला.
