‘The 50’मध्ये रिधी डोगराचा भावनिक खुलासा; युविका चौधरीसमोर सिवेत तोमारसोबतच्या नात्यावर दिलखुलास संवाद
“माझे गेले 2-3 वर्षे खूप कठीण होती… मी सगळ्यांपासून दूर झाले होते,” असे सांगत रिधीने उघड केले मनातील दुःख
टेलिव्हिजन आणि म्युझिक इंडस्ट्रीतील लोकप्रिय चेहऱ्यांनी सजलेला रिअॅलिटी शो The 50 सध्या प्रेक्षकांच्या विशेष चर्चेत आहे. स्पर्धेच्या सुरुवातीला 50 सेलिब्रिटींनी सहभाग घेतला होता; मात्र सलग एलिमिनेशनमुळे आता केवळ 30 स्पर्धक शिल्लक राहिले आहेत. अलीकडील भागात रंगतदार टास्कसोबतच भावनिक क्षणांनीही प्रेक्षकांना खिळवून ठेवले. याच भागात अभिनेत्री Ridhi Dogra हिने Yuvika Choudhary हिच्यासमोर मन मोकळे केले.
Related News
या संवादात रिधीने स्पर्धक Siwet Tomar याच्यासोबतच्या नात्याबाबत स्पष्टपणे भूमिका मांडली. The 50 शोच्या सुरुवातीपासूनच सिवेत रिधीबद्दल आपली भावना उघडपणे व्यक्त करताना दिसतो. अनेकदा तो तिच्याभोवती फिरताना, तिची काळजी घेताना आणि तिच्याशी फ्लर्ट करताना दिसला आहे. मात्र या सर्वांवर रिधीने प्रथमच सविस्तर प्रतिक्रिया दिली.
युविकासोबत गप्पा मारताना रिधी म्हणाली, “मी सिवेतशी बोलले आणि त्याला स्पष्ट सांगितले की हा एक रिअॅलिटी शो आहे. इथल्या भावना आणि संभाषणांना फारसा अर्थ नसतो. तू मला ओळखत नाहीस आणि मीही तुला नीट ओळखत नाही.” तिने पुढे आपल्या आयुष्यातील कठीण काळाचा उल्लेख करत सांगितले, “माझे गेले 2-3 वर्षे खूपच कठीण गेली आहेत. मी मित्र-मैत्रिणीं पासून दूर झाले होते. खूप काही घडले.”
रिधीने तिच्या एकटेपणाबद्दलही खुलासा केला. “मी स्वतःला खूप वेगळे करून घेतले होते. बहुतेक वेळा घरीच राहायचे. त्यामुळे जेव्हा सिवेतने मला आपुलकी दाखवली, तेव्हा मला विश्वासच बसत नव्हता. ‘हे कसं शक्य आहे?’ असा प्रश्न पडला. मला पुन्हा स्वतःला बंद करून घ्यायचं नाही,” असे ती म्हणाली. मात्र तिने हेही स्पष्ट केले की, “फक्त आकर्षण नाही, तर तो माझी काळजी घेतो, हे मला जास्त महत्त्वाचे वाटते.”
यावर युविकाने तिला समजावत सल्ला दिला, “कोणी तुम्हाला आवडत असेल किंवा आपुलकी दाखवत असेल, तर तो क्षण एन्जॉय करा. ते इथे असो किंवा बाहेर, त्याचा फार विचार करू नकोस.” युविकाच्या या शब्दांनी रिधी थोडी भावूक झाल्याचेही दिसून आले.
‘The 50’मधील हा संवाद सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. The 50 रिअॅलिटी शोमध्ये अनेकदा तयार होणारी नाती ही केवळ गेम स्ट्रॅटेजी असतात, असा समज असतो. मात्र रिधीच्या या प्रामाणिक कबुलीजबाबामुळे प्रेक्षकांना तिच्या व्यक्तिमत्त्वाची संवेदनशील बाजू पाहायला मिळाली.
दरम्यान, स्पर्धा अधिक रंगतदार होत असून पुढील भागांमध्ये आणखी धक्कादायक एलिमिनेशन आणि नवे ट्विस्ट पाहायला मिळणार आहेत. रिधी आणि सिवेतचे नाते शोच्या बाहेर कोणते वळण घेते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
