रक्षाबंधनाच्या दिवशी बिबट्याच्या हल्ल्यात भावाचा मृत्यू
बहिणीने शेवटची राखी बांधून दिला निरोप
नाशिकच्या वडनेर दुमाल्यात हृदयद्रावक घटना; परिसरात भीतीचे वातावरण
नाशिक : देशभरात रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा होत असताना नाशिक जिल्ह्यातील वडनेर
गावाजवळच्या शेतात घडलेली घटना सर्वांना अंतर्मुख करून गेली. किरण भगत यांचा तीन वर्षांचा मुलगा आयुष याला
घराजवळ खेळत असताना बिबट्याने उचलून नेले. रात्री तातडीने शोधमोहीम सुरू झाली.
मात्र सुमारे तीन तासांनंतर आयुषचा मृतदेह उसाच्या शेतात आढळला.
बहिणीची अश्रुपूर्ण शेवटची राखी
आज सकाळी आयुषवर अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र, अंत्यसंस्काराआधी त्याची बहीण श्रेया हिने
भावाच्या हातावर शेवटची राखी बांधली आणि ओवाळले. हा क्षण पाहून उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू आले, तर अनेक जण शब्दच हरवून बसले.
बिबट्याचा वाढता वावर, भीतीचे सावट
वडनेर दुमाला परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढला आहे. स्थानिकांनी अनेकदा पिंजरा
लावून बंदोबस्त करण्याची मागणी केली असली तरी ती अद्याप पूर्ण झालेली नाही. या हल्ल्यानंतर परिसरात भीतीचं वातावरण आणखीनच गडद झालं आहे.