बार्शीटाकळी तालुक्यातील टिटवण येथील शेत शिवारात ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली. जीवन मंगू राठोड (वय 47, रा. तिवसा) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शेतात कापसाची पराटी काढण्याचे काम सुरू होते. यावेळी ट्रॅक्टरची पंजी मातीत अडकल्याने अचानक तोल गेल्याची घटना घडली. तोल गेल्याने जीवन राठोड हे ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडले. अपघात इतका भीषण होता की त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच बार्शीटाकळी पोलिस स्टेशनचे ठाणेदार प्रविण धुमाळ आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा सुरू केला असून पुढील तपासासाठी फॉरेन्सिक पथकालाही पाचारण करण्यात आले आहे.
अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळे टिटवण व तिवसा परिसरात शोककळा पसरली आहे. ग्रामस्थांनी हळहळ व्यक्त करत मृत शेतकऱ्याला श्रद्धांजली अर्पण केली.
