१६ हजार विद्यार्थ्यांमधून नासाला भेट देणाऱ्या २५ विद्यार्थ्यांमध्ये निवड
पुण्याच्या भोर तालुक्यातील अतिदुर्गम कोंढरी गावातील सातवी इयत्तेतील आदिती पारठे हिची अमेरिका स्थित नासा या अंतराळ संशोधन संस्थेला भेट
देण्यासाठी निवड झाली आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या १६ हजार १२१ विद्यार्थ्यांपैकी फक्त २५ विद्यार्थ्यांची ही निवड करण्यात आली
असून, आदितीने ही स्पर्धा जिंकून आपले कौतुक सिद्ध केले आहे.या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी तीन टप्प्यांमध्ये परीक्षा दिल्या – लेखी परीक्षा, ऑनलाइन परीक्षा
आणि मुलाखत. या सर्व टप्प्यांमध्ये आदितीने उत्कृष्ट कामगिरी करत नासाला भेट देण्याचा मान मिळवला.आदितीच्या कुटुंबीयांनी तिच्या यशाबद्दल अभिमान
व्यक्त करत सांगितले की, आमच्या घरातील मुलीला आज विमानात बसून सातासमुद्रापार अमेरिकेत जाण्याची संधी मिळाली आहे, हा आमच्यासाठी अत्यंत
आनंदाचा क्षण आहे. आदितीनेही सांगितले की, नासामध्ये जाऊन ती मोठ्या शास्त्रज्ञांना भेटणार असून, तिथे चालत असलेल्या विविध अंतराळ संशोधनांचे
निरीक्षण करण्याची संधी मिळणार आहे.दुर्गम डोंगराळ भागात शिक्षण घेत असतानाही आदितीने कठोर मेहनत, चिकाटी आणि आत्मविश्वास यांमुळे १६ हजार
विद्यार्थ्यांमधून आपले स्थान सिद्ध केले आहे. तिच्या या यशामुळे संपूर्ण परिसरात कौतुकाची लाट पसरली आहे.
Read also : https://ajinkyabharat.com/sangeetachaya-jadne-divyang-bandwanana-dili-navi-enerza/