पुणे विमानतळावर एअरलाईनचा सावळा गोंधळ

पुणे

पुणे : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर इंडिगो एअरलाईन्सच्या ढिसाळ नियोजनामुळे प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला असून सलग दुसऱ्या दिवशी उड्डाणसेवा कोलमडल्याचे चित्र दिसत आहे. वैमानिक व क्रू मेंबर्सच्या टंचाईमुळे अनेक फ्लाइट्स वेळेवर निघू शकल्या नाहीत, तर काही विमानांचे उड्डाण अखेर रद्द करण्यात आले. या गोंधळात सर्वसामान्य प्रवाशांपासून ते लोकप्रतिनिधींपर्यंत सगळ्यांनाच मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे.

गेल्या दोन दिवसांत पुणे विमानतळावरून इंडिगोच्या १६ हून अधिक फ्लाइट्स रद्द करण्यात आल्या असून १९ हून अधिक उड्डाणे अनेक तास विलंबाने सुरू झाली आहेत. नियोजित वेळापत्रक पूर्णपणे कोलमडल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली. अनेक प्रवासी तासंतास विमानतळावर अडकून पडले होते, तर काहींना प्रवासच रद्द करण्याची नामुष्की सहन करावी लागली.

पार्किंग क्षमतेचा ताण

पुणे विमानतळावर एकाचवेळी केवळ १० विमानांची पार्किंग व्यवस्था उपलब्ध आहे. मात्र इंडिगोच्या अंतर्गत व्यवस्थापनातील बिघाडामुळे वेळेवर क्रू न मिळाल्याने कंपनीची ९ विमाने तासनतास पार्किंग बेमध्येच उभी राहिली. यामुळे इतर एअरलाईन्सच्या विमानांनाही उतरण्यास अडचणी निर्माण झाल्या.

Related News

पुणे विमानतळाचे संचालक संतोष धोके यांनी दिलेल्या माहितीनुसार, क्रू-व्यवस्थापनात अडचणी निर्माण झाल्याने अनेक फ्लाइट्स उशीराने पार्किंग सोडत आहेत. परिणामी पार्किंग बे दीर्घकाळ व्यापले जात असून संपूर्ण वाहतूक व्यवस्थेवर याचा परिणाम होत आहे. जागाच उपलब्ध नसल्याने काही विमानांना मुंबईकडे वळवावे लागले. नागपूरसाठी जाणारी सकाळची इंडिगो फ्लाईटही याच कारणामुळे जवळपास दोन तास उशिराने रवाना झाली.

प्रवाशांची तक्रार : माहितीच दिली नाही

या गोंधळामुळे सर्वाधिक फटका बसला तो लग्न समारंभासाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना. पुण्याहून जोधपूरला जाणाऱ्या एका प्रवाशाने बोलताना सांगितले,

“आम्ही सकाळी ५ वाजता घरातून विमान पकडण्यासाठी निघालो होतो. मात्र, विमान रद्द झाल्याबाबत आम्हाला कोणताही मेसेज किंवा कॉल करण्यात आलेला नव्हता. काल चौकशी केली तेव्हा ‘फ्लाईट उद्या होईल’ असं सांगण्यात आलं होतं. आजही कॅन्सल झाल्याचं कळलं. कालच माहिती मिळाली असती तर आम्ही ट्रेन किंवा बसने प्रवास केला असता. आजपासून लग्नाचे कार्यक्रम सुरू आहेत, त्यामुळे आमची मोठी अडचण झाली आहे.”

काही प्रवाशांच्या तिकीटांची रक्कम परत मिळालेली नसून पुढील फ्लाईट कधी मिळेल याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही, असा आरोपही करण्यात येत आहे.

खासदार अमोल कोल्हे यांनाही फटका

या गोंधळाचा फटका शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे यांनाही बसला. पुण्याहून प्रवासासाठी निघालेले कोल्हे तब्बल दोन तास उशिरापर्यंत विमानतळावर थांबले. अखेरीस तीन तासांनी संबंधित फ्लाईट रद्द करण्यात आली. यानंतर त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत संताप व्यक्त केला.

“देशांतर्गत विमान सेवेच्या सावळ्या गोंधळामुळे प्रथम फ्लाईट उशिरा आणि मग थेट तीन तासांनी कॅन्सल! सिस्टीम वेळ वाया घालवत असली तरी मी नाही. या अनपेक्षित निवांत वेळेत मी महत्त्वाचं लेखन पूर्ण केलं. त्रास आहेच, पण होऊ दिला नाही याचं समाधान आहे. इंडिगोकडून अशी अपेक्षा नव्हती… यापुढे इंडिगोचा प्रवास नकोच..! जय शिवराय!” — अशी पोस्ट अमोल कोल्हेंनी केली.

राजकीय टीका

या घटनेवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका करत निशाणा साधला आहे.“इंडिगोचा हा गोंधळ सरकारच्या मक्तेदारी मॉडेलचं प्रत्यक्ष उदाहरण आहे. उड्डाण विलंब, फ्लाईट कॅन्सलेशन आणि प्रवाशांची हतबलता ही सर्वसामान्य भारतीयांना भोगावी लागत आहे. देशाला निष्पक्ष स्पर्धेची गरज आहे, मक्तेदारीची नाही,” असे राहुल गांधी यांनी म्हटले.

प्रवाशांचा संताप, सुधारण्याची मागणी

विमानतळावर अडकलेल्या अनेक प्रवाशांनी इंडिगो प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे. वेळेवर माहिती न देणे, हेल्पडेस्ककडून समाधानकारक उत्तरे न मिळणे आणि पर्यायी व्यवस्था न करणे यामुळे प्रवासी अक्षरशः हैराण झाले आहेत.बऱ्याच जणांनी सोशल मीडियावर व्हिडीओ आणि फोटो शेअर करत आपली व्यथा मांडली आहे. “तिकिट काढूनही प्रवाशांना अशी वागणूक मिळते का?” असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

तातडीने कारवाईची मागणी

पुणे विमानतळावरील सततच्या विलंबामुळे प्रवाशांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. इंडिगोच्या ढिसाळ नियोजनावर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) लक्ष द्यावे आणि प्रवाशांच्या सोयीसाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे.सध्या तरी पुणे विमानतळावरील हा गोंधळ कधी थांबणार, प्रवाशांचा त्रास कधी कमी होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले असून इंडिगो प्रशासनाकडून ठोस खुलासे आणि सुधारक उपायांची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

read also : https://ajinkyabharat.com/ladki-bahin-yojnat-motha-update/

Related News