अकोट – महाराष्ट्रातील जाचक अवैध सावकारीमुळे शेतकरी व श्रमिकांवर होणाऱ्या आर्थिक आणि मानसिक त्रासामुळे राज्यभर अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची घटना चिंताजनक ठरली आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सावकारग्रस्त शेतकरी समितीने राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर Nagpur मध्ये दिनांक १२ डिसेंबर रोजी धंतोली स्टेडियम येथे एक दिवसीय धरणे आंदोलन आयोजित केले आहे.
शेतकऱ्यांवर अवैध सावकारीचे वाढते प्रमाण, सहकार विभागातील अधिकारी व सावकार यांच्यातील सापळे, आणि पिढीत शेतकऱ्यांना होणारा छळ या सर्व गोष्टींचा निषेध या आंदोलनाद्वारे करण्यात येणार आहे. समितीच्या माहितीनुसार, महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ अस्तित्वात आलेले जवळपास १२ वर्ष झाली तरी, त्यातील अनेक तृटीमुळे कठोर अंमलबजावणी होत नाही. कायद्यातील पळवाटांचा गैरफायदा घेऊन काही सहकार, महसूल व पोलीस अधिकारी सावकारांकडून पैसे घेऊन निषेध नोंदवतात, त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळण्याऐवजी त्रास वाढतो आहे.
या आंदोलनात समितीने राज्य सरकारकडे अनेक मागण्या ठेवल्या आहेत. त्यात सावकारी कायद्यातील तृटींचा अभ्यास करण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली तात्काळ अवलोकन समिती स्थापन करणे, कौटुंबिक न्यायालयांसारखे स्वतंत्र न्यायालये स्थापन करणे, सहकार विभागातील अधिकारी बदलण्याची नियमावली सुधारणे, कलम १५ आणि कलम १३ ची प्रभावी अंमलबजावणी करणे यांचा समावेश आहे. तसेच, सावकार पिढीत शेतकऱ्यांना उपद्रव दिल्यास महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ लागू करण्याची तरतूद करावी, तसेच राज्यभर मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या मनमानी कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी समितीच्या अस्तित्वाचा विस्तार करावा, अशी मागणी केली आहे.
Related News
समितीच्या वतीने संस्थापक अध्यक्ष नेताजी अरूण जाधव, प्रदेश अध्यक्ष बालासाहेब भाबट खादगावकर, अध्यक्ष रमेश पाटील खिरकर, महिला प्रदेश अध्येक्ष सुनीता ताथोड, कार्याध्यक्ष अशोकराव वाटणे, नाशिक विभागीय अध्यक्ष दिपक जाधव, अमरावती विभागीय अध्येक्ष गणेश माथाणकर, औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष अमोल आळंजकर, महिला प्रदेशध्यक्ष सुनीता ताथोड व महिला संघटक सुप्रीया आखाडे यांच्यासह विविध विभागीय नेत्यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन आयोजित केले जात आहे.
महाराष्ट्र सावकारग्रस्त शेतकरी समितीने राज्यातील सर्व सावकारग्रस्त शेतकऱ्यांना Nagpur येथे आंदोलन स्थळी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. आंदोलनाद्वारे राज्यातील अवैध सावकारीवर नियंत्रण आणणे, पिढीत शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणे आणि सावकारी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करणे हा मुख्य उद्देश असल्याचे समितीने सांगितले आहे
read also : https://ajinkyabharat.com/policeman-caught-faking-suicide-by-suffocating-accused/
