Poonam Serial Killer Case : सौंदर्याची ईर्ष्या अन् निर्घृण हत्यांचा रक्तरंजित इतिहास

Poonam Serial Killer Case

Poonam Serial Killer Case ने संपूर्ण देशाला हादरवून टाकले आहे. हरियाणातील पानीपत जिल्ह्यातील ही घटना म्हणजे आधुनिक भारतातील सर्वात भयावह कौटुंबिक गुन्ह्यांपैकी एक मानली जात आहे. एका सुशिक्षित महिलेने — जी एम.ए.पर्यंत शिकलेली होती — स्वतःचीच मुलं आणि नात्यातील लहान बालकं केवळ “सौंदर्याच्या ईर्ष्येपोटी” पाण्यात बुडवून ठार मारली.या घटनेने एक भयावह सत्य समोर आणलं – हिंसा ही अशिक्षितपणातूनच जन्मते, असं नाही; मानसिक विकृती कुणालाही हैवान बनवू शकते. 

हरियाणातील पानीपत जिल्ह्यातून उघडकीस आलेल्या एक धक्कादायक हत्याकांडाने संपूर्ण देश हादरून गेला आहे. पूनम नावाच्या महिलेनं सौंदर्याच्या ईर्ष्येपोटी स्वतःच्याच कुटुंबातील लहान मुलांची निर्घृण हत्या केल्याचं समोर आलं आहे. आई, मामी, काकी, आत्या यांसारख्या नातेसंबंधांना काळीमा फासत पूनमनं नणंदेची मुलगी, स्वतःचा चिमुकला मुलगा, भाची आणि एका लग्नातील सहा वर्षांच्या मुलीला पाण्यात बुडवून ठार केल्याचा आरोप आहे. तिच्या या कृत्यांमुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

पूनमच्या हत्याकांडाची सुरुवात सन 2023 मध्ये झाली. सासरी सोनीपतच्या बोहड गावात असताना नणंदेच्या लहान मुलीला तिनं आंघोळीच्या टबमध्ये बुडवून मारलं. ती मुलगी आपल्यापेक्षा जास्त सुंदर आहे, या विकृत विचारातून पूनमनं हे पाऊल उचलल्याचं पोलिसांच्या चौकशीत उघड झालं. कोणतीही शंका येऊ नये म्हणून तिनं आपल्याच पोटच्या मुलालासुद्धा तशाच पद्धतीनं बुडवून ठार केलं. दोन्ही मृत्यू अपघात वाटावेत म्हणून तिनं रडण्याचं नाटक करत साऱ्यांना गंडवलं. कुठलाही तपास न होता अंत्यसंस्कारही पार पडले.

Related News

यानंतर 2025 मध्ये पूनम माहेरी सिवाह गावात आली. तिथे भावाची मुलगी जिया हिला पाहून तिच्यात पुन्हा ईर्षेची ठिणगी पेटली. “माझ्यापेक्षा ही सुंदर कशी?” या प्रश्नानं तिचं डोकं पेटलं. रात्री झोपण्यापूर्वी जियाला पूनम आत्तीकडेच झोपण्याची परवानगी काढायला लावली. मध्यरात्री साधारण दोन वाजता जियाला कडेवर घेऊन ती गोठ्यात गेली आणि हौदात बुडवून तिची हत्या केली. हा मृत्यूही अपघात समजून दुर्लक्षित करण्यात आला. त्यामुळे पूनमची हिंमत अधिकच वाढली.

पॉलिटिकल सायन्समध्ये एम.ए. झालेली पूनम शिक्षणाने सुशिक्षित असली तरी तिच्या वर्तनात क्रौर्यच दिसून आलं. 1 डिसेंबर 2025 रोजी एका लग्न सोहळ्यात तिनं आणखी एक भयंकर कट रचला. सहा वर्षांची विधी हिला छतावर नेऊन टबमध्ये बुडवून ठार मारण्याचा तिनं प्रयत्न केला. मात्र यावेळी विधीनं सुटण्याचा झगडा केला. झटापटीत पूनमचे कपडे भिजले. संशयित हालचाली पाहून कुटुंबीयांनी तिला प्रश्न विचारले. एकाच वेळी वेगवेगळी कारणं सांगताना तिचं बिंग फुटलं आणि उपस्थितांच्या संशयातून पोलिसांना माहिती देण्यात आली.

चौकशीत चौघीही हत्यांची कबुली देताच पूनमला अटक करण्यात आली. सौंदर्याची ईर्ष्या आणि मानसिक विकृती यामुळेच हे धक्कादायक हत्याकांड घडल्याचं पोलिस सांगत आहेत. या प्रकरणानं संपूर्ण देशाला हादरवून टाकलं असून, निष्पाप जीवांच्या या अमानुष हत्येनं मानवी नातेसंबंधांवरच प्रश्नचिन्ह उभं केलं आहे.

आज “सायको किलर पूनम” म्हणून ओळख निर्माण झालेल्या या महिलेबाबत समाजात एकच सवाल आहे – “पूनम, तू असं का केलंस?”

read also : https://ajinkyabharat.com/7-powerful-benefits-of-using-baking-soda-under-bed/

Related News