विषमुक्त शेतीकडे माटोडा; अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष पाहणी

विषमुक्त शेती
प्रतिनिधी  : योगेश आगाशे

राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशनअंतर्गत माटोडात विषमुक्त शेतीला चालना

मूर्तिजापूर तालुक्यातील माटोडा गावाने विषमुक्त, सेंद्रिय व नैसर्गिक शेतीच्या दिशेने ठाम पाऊल टाकत एक आदर्श निर्माण केला आहे. राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत गेल्या तीन वर्षांपासून गावात नैसर्गिक शेतीचे यशस्वी प्रयोग सुरू असून, या उपक्रमामुळे केवळ उत्पादन पद्धतीतच नव्हे तर शेतकऱ्यांच्या विचारधारेलाही सकारात्मक वळण मिळाले आहे. रासायनिक खतांवर अवलंबून असलेल्या पारंपरिक शेतीऐवजी कमी खर्चाची, पर्यावरणपूरक आणि आरोग्यदायी शेती शक्य आहे, हे माटोडा गावाने प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले आहे.

या पार्श्वभूमीवर आत्मा, अकोला प्रकल्प संचालक तसेच राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशनचे अध्यक्ष डॉ. मुरली इंगळे, उपसंचालक प्रेमसिंग मारक आणि तालुका कृषी अधिकारी दीपक तायडे यांनी माटोडा गावास भेट देत नैसर्गिक शेतीच्या उपक्रमांची प्रत्यक्ष पाहणी केली. अधिकाऱ्यांच्या या भेटीमुळे गावातील शेतकऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, त्यांच्या प्रयत्नांना शासनस्तरावरून दखल मिळत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

भेटीदरम्यान प्रगतशील शेतकरी गजानन ढोकणे यांच्या शेतात नैसर्गिक शेतीचे विविध प्रयोग अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष दाखविण्यात आले. गांडूळखत निर्मिती, ड्रायक्रोड्रमा, दसपर्णी अर्क, जीवामृत तसेच एस-नाईन कल्चरच्या सहाय्याने काडी-कचऱ्यापासून सेंद्रिय खत कसे तयार केले जाते, याचे सविस्तर प्रात्यक्षिक यावेळी सादर करण्यात आले. शेतीतून निघणारा कचरा पुन्हा शेतीसाठी उपयोगात आणत कचऱ्याचे सोनं कसे करता येते, हे पाहून उपस्थित अधिकारी व शेतकरी प्रभावित झाले.

Related News

रासायनिक खतांचा अतिरेक केल्यामुळे मातीची सुपीकता कमी होत असल्याचे चित्र अनेक भागांत दिसून येते. मात्र नैसर्गिक शेतीमुळे मातीचा कस वाढतो, पिकांची रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते आणि उत्पादन खर्चात लक्षणीय बचत होते, असे मत अधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केले. विशेष म्हणजे नैसर्गिक पद्धतीने घेतलेले उत्पादन हे आरोग्याच्या दृष्टीनेही सुरक्षित असल्याने बाजारात त्याला चांगला भाव मिळण्याची शक्यता असते, असेही त्यांनी नमूद केले.

डॉ. मुरली इंगळे यांनी माटोडा गावातील शेतकऱ्यांचे कौतुक करत सांगितले की, “नैसर्गिक शेती ही केवळ एक शेती पद्धत नसून ती शाश्वत विकासाची दिशा आहे. माटोडा गावाने उचललेले पाऊल इतर गावांसाठी मार्गदर्शक ठरेल.” शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून अशा उपक्रमांना अधिक बळ देण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

या पाहणीप्रसंगी सरपंच संगीता गजानन ढोकणे, शेतकरी विठ्ठल चोपडे, विश्वास इंगळे, साधना विक्की धामणे, भीमराव शेंडे, कृषी सहाय्यक प्रिती दांदळे यांच्यासह गावातील अनेक शेतकरी उपस्थित होते. नैसर्गिक शेतीमुळे मिळणारे फायदे प्रत्यक्ष अनुभवत असल्याने भविष्यात अधिकाधिक शेतकरी या पद्धतीकडे वळतील, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

एकूणच माटोडा गावाने विषमुक्त शेतीकडे केलेली वाटचाल ही केवळ एका गावापुरती मर्यादित न राहता संपूर्ण तालुक्यासाठी प्रेरणादायी ठरत आहे. शेतकरी, प्रशासन आणि शासन यांचा समन्वय साधत नैसर्गिक शेतीचा हा प्रयोग यशस्वी ठरल्यास ग्रामीण भागातील शेतीचे भविष्य अधिक सुरक्षित आणि समृद्ध होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Related News