PM Narendra Modi : 7 मोठी आवाहनं! ऑनलाइन क्लासेस, WFH, सोनं खरेदी टाळा; मोदींच्या वक्तव्याने देशभर खळबळ

PM Narendra Modi

भारतासह संपूर्ण जग सध्या मध्य पूर्वेत सुरू असलेल्या संघर्षाच्या परिणामांना सामोरे जात आहे. या युद्धामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये मोठी वाढ झाली असून त्याचा थेट परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवर होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान Narendra Modi यांनी गुजरातमधील सभेत देशवासीयांना अनेक महत्त्वाच्या सूचना केल्या. विशेष म्हणजे, त्यांनी केवळ इंधन बचतीवर भर दिला नाही तर शाळांना ऑनलाइन क्लासेस सुरू करण्याचाही आग्रह केला.

पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं की, सध्याच्या परिस्थितीत देशाच्या परकीय चलनावर मोठा ताण पडत आहे. भारत मोठ्या प्रमाणावर कच्चे तेल आयात करतो. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करणं ही आता केवळ वैयक्तिक गरज नसून राष्ट्रीय जबाबदारी बनली आहे.

‘WFH आणि ऑनलाइन मीटिंगला प्राधान्य द्या’

मोदी यांनी सरकारी आणि खासगी क्षेत्राला डिजिटल तंत्रज्ञानाचा अधिक वापर करण्याचं आवाहन केलं. “डिजिटल टेक्नोलॉजीमुळे अनेक गोष्टी आता सहज शक्य झाल्या आहेत. त्यामुळे जिथे शक्य असेल तिथे वर्क फ्रॉम होम आणि ऑनलाइन मीटिंगला प्राधान्य दिलं पाहिजे,” असं ते म्हणाले.

Related News

कोविड काळात देशभरात मोठ्या प्रमाणावर ऑनलाइन कामकाज आणि डिजिटल शिक्षणाची व्यवस्था लागू झाली होती. आता पुन्हा एकदा मोदींनी अशाच प्रकारच्या उपायांचा उल्लेख केल्याने विविध स्तरांवर चर्चांना उधाण आलं आहे.

शाळांना ऑनलाइन क्लासेसचा सल्ला

मोदींनी आपल्या भाषणात शाळांचाही विशेष उल्लेख केला. “मी काही शाळांना आग्रह करतो की त्यांनी काही काळासाठी ऑनलाइन क्लासेसच्या व्यवस्थेवर भर द्यावा,” असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं.

या वक्तव्यानंतर अनेक पालक, शिक्षक आणि शैक्षणिक संस्थांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. कोविडनंतर विद्यार्थ्यांनी पुन्हा ऑफलाइन शिक्षण स्वीकारलं असताना आता ऑनलाइन वर्गांचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे.

पेट्रोल-डिझेल वापर कमी करण्याचं आवाहन

पंतप्रधानांनी नागरिकांना शक्य तितका सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याचा सल्ला दिला. मेट्रो, इलेक्ट्रिक बस आणि इतर सार्वजनिक वाहनांचा अधिक वापर केल्यास इंधनाची मोठ्या प्रमाणावर बचत होऊ शकते, असं त्यांनी म्हटलं.त्यांनी कारपूलिंगलाही प्रोत्साहन दिलं. “एका गाडीत जास्त लोकांनी प्रवास केला तर इंधनाची बचत होईल आणि वाहतूक कोंडीही कमी होईल,” असं मोदी म्हणाले.

‘सोनं खरेदी टाळा’

मोदींच्या भाषणातील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सोन्याच्या खरेदीबाबतचं आवाहन. भारतात मोठ्या प्रमाणावर सोन्याची आयात केली जाते. त्यामुळे परकीय चलनाचा मोठा भाग या आयातीवर खर्च होतो.“परिस्थिती सामान्य होईपर्यंत नागरिकांनी सोनं खरेदी करणं टाळावं,” असं आवाहन मोदींनी केलं. त्यांच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटताना दिसल्या.

खाद्यतेलाच्या वापरावर संयम ठेवण्याचं आवाहन

मोदींनी केवळ इंधनच नाही तर खाद्यतेलाच्या वापराबाबतही चिंता व्यक्त केली. भारत मोठ्या प्रमाणावर खाद्यतेल आयात करतो. त्यामुळे त्यावरही परकीय चलन खर्च होतं.“आपण खाद्यतेलाचा वापर थोडा कमी केला तर देशाचंही भलं होईल आणि आरोग्यालाही फायदा होईल,” असं ते म्हणाले.

‘Vocal For Local’ वर पुन्हा भर

मोदींनी ‘वोकल फॉर लोकल’ अभियानाचा पुनरुच्चार करत नागरिकांना भारतीय उत्पादनांना प्राधान्य देण्याचं आवाहन केलं. “विदेशी वस्तूंऐवजी स्थानिक उत्पादनांची खरेदी करा. त्यामुळे देशातील उद्योगांना बळ मिळेल,” असं त्यांनी सांगितलं.

नैसर्गिक शेती आणि सोलार पंपांचा उल्लेख

शेतकऱ्यांसाठीही मोदींनी महत्त्वाचा संदेश दिला. त्यांनी रासायनिक खतांऐवजी नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्याचं आवाहन केलं. तसेच डिझेल पंपांच्या ऐवजी सोलार पंपांचा वापर वाढवण्यावर भर दिला.

“आपल्याला आपल्या जमिनीचं आणि पर्यावरणाचं संरक्षण करायचं आहे,” असं मोदी म्हणाले.

डेस्टिनेशन वेडिंगवरही भाष्य

मोदींनी विदेशात होणाऱ्या डेस्टिनेशन वेडिंगवरही भाष्य केलं. “भारतात लग्नासाठी सुंदर आणि पवित्र स्थळांची कमतरता नाही. त्यामुळे विदेशात खर्च करण्याऐवजी भारतातच विवाह सोहळे आयोजित करा,” असं त्यांनी सांगितलं.

देशभरात चर्चांना उधाण

मोदींच्या सलग दोन दिवसांच्या आवाहनांनंतर देशभरात विविध चर्चांना सुरुवात झाली आहे. कोविड काळातील नियम पुन्हा लागू होणार का, ऑनलाइन शिक्षण आणि WFH पुन्हा मोठ्या प्रमाणावर सुरू होणार का, याबाबत लोकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

मात्र, केंद्र सरकारकडून अद्याप कोणतेही निर्बंध किंवा नियम लागू करण्याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. तरीही पंतप्रधानांच्या या वक्तव्यांमुळे देशातील नागरिक, उद्योग क्षेत्र आणि शिक्षण व्यवस्थेचे लक्ष वेधले गेले आहे.

read also :  https://ajinkyabharat.com/disturbing-alert-for-hantavirus-cruise-ship-with-3-deaths-big-hint-for-6-week-quarantine/

Related News