पिंजर हद्दीत अल्पवयीन मुलीची छेडछाड; आरोपी तात्काळ अटकेत

पिंजर

बार्शीटाकळी प्रतिनिधी : पिंजर पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात १६ वर्षीय अल्पवयीन मुलीची छेडछाड केल्याची गंभीर आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पिंजर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गंगाधर दराडे आणि पीएसआय अभिषेक नवघरे यांनी तत्काळ आणि प्रभावी कारवाई करत आरोपीला अटक केली असून, या कार्यवाहीमुळे परिसरात पोलिसांच्या संवेदनशील आणि कर्तव्यदक्ष भूमिकेचे कौतुक होत आहे.

प्राप्त माहितीनुसार, संबंधित अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबासोबत गावात वास्तव्यास आहे. आरोपी मंगेश जाधव हा काही दिवसांपासून तिच्या घराबाहेर वारंवार येत होता. तो मुलीकडे अश्लील हावभाव करत, गैरवर्तन करून तिचा मानसिक छळ करत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकारामुळे मुलगी भयभीत झाली होती व तिला मानसिक त्रास सहन करावा लागत होता.

अखेर धैर्य एकवटून पीडित मुलीने आपल्या कुटुंबीयांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर पिंजर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली. तक्रार प्राप्त होताच ठाणेदार गंगाधर दराडे यांनी क्षणाचाही विलंब न करता मुलीची तक्रार नोंदवून घेतली. अल्पवयीन असल्याने संपूर्ण प्रक्रिया अत्यंत संवेदनशीलतेने पार पाडण्यात आली.

Related News

त्यानंतर पोलीस पथकाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. तक्रारीच्या आधारे आरोपी मंगेश जाधव याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत संबंधित कलमांसह बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (POCSO Act) अंतर्गत कलम ८ आणि १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता आरोपीस तात्काळ अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणात ठाणेदार गंगाधर दराडे यांनी स्वतः पीडित अल्पवयीन मुलीशी संवाद साधून तिची संपूर्ण बाजू समजून घेतली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पीडितेला आवश्यक मानसिक धीर, समुपदेशन व संरक्षण देण्याची कार्यवाही करण्यात आली. कायद्याच्या चौकटीत राहून पीडितेचे हक्क सुरक्षित ठेवण्यावर भर देण्यात आला आहे.

या गुन्ह्याची नोंद हेड कॉन्स्टेबल चंद्रशेखर गोरे यांनी केली आहे. पुढील तपास ठाणेदार गंगाधर दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल सुभाष उघडे, नागसेन वानखेडे, चंद्रशेखर गोरे, पोलीस कॉन्स्टेबल वैभव मोरे व वाहनचालक यांच्या पथकाकडून सुरू आहे.या तत्पर आणि ठोस कारवाईमुळे पिंजरसह परिसरात महिलांच्या व अल्पवयीनांच्या सुरक्षेबाबत पोलिसांच्या भूमिकेवर विश्वास अधिक दृढ झाला असून, नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

read also : https://ajinkyabharat.com/saint-gadge-baba-pioneer-of-village-cleanliness/

Related News