निदा खान निर्दोष सुटेल’; ओवेसींचा मोठा दावा, सुशिक्षित मुस्लिम तरुणांना टार्गेट केल्याचा आरोप

ओवेसीं

छत्रपती संभाजीनगरमध्ये आज एआयएमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. नाशिकमधील बहुराष्ट्रीय कंपनीशी संबंधित कथित “कॉर्पोरेट जिहाद” आणि बेकायदेशीर धर्मांतर प्रकरणात अटक झालेल्या निदा खानच्या समर्थनार्थ ओवेसी यांनी जोरदार भूमिका घेतली. “निदा खान हिची कोर्टातून निर्दोष सुटका होईल,” असा ठाम दावा करत त्यांनी या प्रकरणामागे “सुशिक्षित मुस्लिम तरुणांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न” असल्याचा गंभीर आरोप केला.

ओवेसी आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पक्षाच्या नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली. निवडणूक आयोगाच्या SIR मोहिमेबाबत मार्गदर्शन करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीनंतर पत्रकार परिषदेत त्यांनी निदा खान प्रकरणावर सविस्तर प्रतिक्रिया दिली.

“टीसीएसच्या स्टेटमेंटमध्येच स्पष्ट झालं…”

ओवेसी म्हणाले की, संबंधित बहुराष्ट्रीय कंपनीच्या अधिकृत निवेदनातच निदा खानचा एचआर विभागाशी कोणताही संबंध नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. “या प्रकरणात एकूण नऊ एफआयआर दाखल झाले आहेत. त्यातील एका एफआयआरमध्ये धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत निदा खानचं नाव टाकण्यात आलं. मात्र एफआयआर दाखल होण्यापूर्वीच तिचं ट्रान्सफर झालं होतं. तिचा त्या कंपनीशी काहीही संबंध उरलेला नव्हता,” असा दावा त्यांनी केला.

Related News

ओवेसींनी यावेळी तक्रारदारावरही अप्रत्यक्ष निशाणा साधला. “या प्रकरणातील तक्रारदार हा सत्ताधारी पक्षाशी संबंधित आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाकडे राजकीय दृष्टीने पाहिलं जात आहे,” असा आरोप त्यांनी केला.

“मीडिया ट्रायल धोकादायक”

प्रकरणावर माध्यमांमध्ये सुरू असलेल्या चर्चेबाबतही ओवेसींनी नाराजी व्यक्त केली. “कोर्टाचा निर्णय येण्याआधीच काही लोकं मीडिया ट्रायल करत आहेत. मीडिया जर ज्युरीची भूमिका निभावू लागला तर ते लोकशाहीसाठी धोकादायक आहे,” असा इशारा त्यांनी दिला.

त्यांच्या मते, तपास पूर्ण होण्यापूर्वीच आरोपींना दोषी ठरवण्याचा प्रयत्न सुरू आहे. “कोर्टात पुरावे सादर होण्याआधी कुणालाही गुन्हेगार म्हणणं चुकीचं आहे,” असं ते म्हणाले.

“बुर्खा सापडला म्हणजे गुन्हा?”

ओवेसींनी तपास यंत्रणांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना काही मुद्दे मांडले. “एफआयआरमध्ये लिहिलं आहे की, तिच्या घरातून बुर्खा, नकाब आणि पैगंबर मोहम्मद यांच्यावरील पुस्तक मिळालं. बुर्खा कधीपासून आक्षेपार्ह झाला? नकाब कधीपासून गुन्हा झाला?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

त्यांनी पुढे दिल्लीतील जुन्या प्रकरणांचा संदर्भ देत सांगितलं की, “पूर्वी काही मुस्लिम तरुणांना त्यांच्या घरात उर्दू साहित्य सापडल्यामुळे दहशतवादी ठरवण्याचा प्रयत्न झाला होता. पण कोर्टाने ते आरोप फेटाळले. त्यामुळे न्यायालयावर विश्वास ठेवायला हवा.”

“कोर्ट योग्य न्याय देईल”

ओवेसी यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की, “निदा खानची निर्दोष सुटका होईल. तिच्यावरचे आरोप सिद्ध होणार नाहीत.” त्यांनी पुढे आरोप केला की, “हे सगळं मुस्लिम समाजातील सुशिक्षित तरुणांना त्रास देण्यासाठी केलं जात आहे.”

त्यांच्या मते, एखाद्यावर गुन्हा दाखल झाला म्हणजे तो दोषी ठरत नाही. “जोपर्यंत कोर्ट दोष सिद्ध करत नाही, तोपर्यंत प्रत्येक व्यक्ती निर्दोष असते,” असं त्यांनी सांगितलं.

AIMIM नगरसेवक मतीन पटेलच्या अटकेवरही प्रतिक्रिया

या प्रकरणात एआयएमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यावर प्रतिक्रिया देताना ओवेसी म्हणाले, “आमचा कार्यकर्ता कोर्टात जाऊन स्वतःची बाजू मांडेल. कायदेशीर प्रक्रियेला आम्ही सामोरं जाऊ.”

त्यांनी पुढे मुंबई ट्रेन ब्लास्ट आणि मालेगाव ब्लास्ट प्रकरणांचा उल्लेख करत तपास प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले. “अनेक प्रकरणांमध्ये लोक वर्षानुवर्षं तुरुंगात राहिले, पण नंतर निर्दोष सुटले. त्यामुळे न्याय प्रक्रियेला वेळ द्यायला हवा,” असं ते म्हणाले.

“राजकीय वातावरण निर्मिती सुरू”

ओवेसींनी आरोप केला की, या प्रकरणाचा वापर केवळ राजकीय वातावरण निर्मितीसाठी केला जात आहे. “ब्रेकिंग न्यूजसाठी वातावरण तापवलं जातं, पण नंतर सत्य समोर आलं की सगळं शांत होतं,” असा दावा त्यांनी केला.

त्यांनी विधानसभेतील आणि संसदेतील अनेक लोकप्रतिनिधींवर गुन्हे दाखल असल्याचाही मुद्दा उपस्थित केला. “गुन्हा दाखल झाला म्हणजे व्यक्ती दोषी ठरत नाही,” असं सांगत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

महाराष्ट्राच्या राजकारणात नवा वाद

निदा खान प्रकरणामुळे आता महाराष्ट्रातील राजकारण तापण्याची शक्यता आहे. एका बाजूला हिंदुत्ववादी संघटना आणि सत्ताधारी पक्ष या प्रकरणात कठोर कारवाईची मागणी करत आहेत, तर दुसरीकडे ओवेसी आणि AIMIM याला मुस्लिम तरुणांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न असल्याचं सांगत आहेत.

दरम्यान, पोलिस तपास सुरू असून पुढील काही दिवसांत या प्रकरणात आणखी खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोर्टात या प्रकरणाची पुढील सुनावणी महत्त्वाची ठरणार आहे.

Related News