नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील भरड्याची वाडी येथे आदिवासी कुटुंबाशी संबंधित एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका 45 वर्षीय महिलेवर आरोप आहे की, अत्यंत दारिद्र्यातून ती आपल्या 14 मुलांपैकी 6 मुलांना पैशांसाठी विकत असल्याचा संशय आहे. ही घटना संपूर्ण जिल्ह्यात खळबळ निर्माण करणारी ठरली आहे.
सामाजिक कार्यकर्ते भगवान मधे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलेची परिस्थिती अतिशय गंभीर होती. ती आपल्या 14 मुलांपैकी 4 ते 6 मुलांना पैशासाठी द्यावे लागल्याची शक्यता व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे, महिला 14 वे मूल जन्माला आले तेव्हा ती तपासणीतही गेली नव्हती. सामाजिक कार्यकर्त्यांनी तिला रुग्णालयात दाखल करून सुरक्षित प्रसूती केली होती. मात्र, प्रसूतिनंतर दोन महिने उलटले असतानाच, ती बाळ अवघ्या 10 हजार रुपयांमध्ये एका व्यक्तीकडे दिल्याचा संशय आहे.
भगवान मधे यांनी प्रशासनावर आरोप करत म्हटले की, आजही पैशासाठी कुठल्याही मातेला आपल्या पोटच्या गोळ्याला विकावं लागत असेल, यासाठी संपूर्ण जबाबदारी प्रशासन आणि शासनाची आहे. तसेच, त्यांनी या मातेला घरकुलही न मिळाल्याचा आरोप केला आहे आणि बालविकास विभागाला पूर्ण चौकशी करण्याची मागणी केली आहे.
Related News
घटनेची तातडीने माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि आशा सेविकांनी घटनास्थळी धाव घेतली. आशा सेविकांच्या अहवालानुसार, महिला बाळ देऊन टाकले असल्याचे सांगत होती, परंतु त्या ठिकाणी इतर तीन-चार बाळे घरात आढळली. या प्रकरणावर लक्ष देताना नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, पोलीस प्रशासन आणि तहसील अधिकारी घटनास्थळी पोहोचले.
प्राथमिक तपासानुसार, कुटुंबात 14 पैकी 12 मुले जिवंत असल्याचे आढळले आहे. त्यापैकी 1 मूल मयत असून, 3 मुले तिन्ही वेगवेगळ्या ठिकाणी हस्तांतरित केली गेली आहेत. ही मुले आणि संबंधित कुटुंबे घोटी पोलीस स्टेशनवर आणण्यात आले आहेत. सध्या आई-वडील आणि इतर 11 मुले पोलीसांच्या देखरेखीखाली आहेत.
पोलीस अधीक्षक पाटील यांनी स्पष्ट केले की, मुलांच्या विक्री किंवा हस्तांतरणाच्या प्रकरणाची सखोल चौकशी चाईल्ड वेल्फेअर कमिटी (CWC) मार्फत केली जात आहे. प्रत्येक मुलाची आणि कुटुंबाची तपासणी पूर्ण करण्यासाठी CWC तज्ज्ञ काम करत आहेत.
CWC अहवालानंतर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल. सध्या परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने, मुलांच्या विक्रीच्या मागील खऱ्या कारणांचा शोध घेण्यात येत आहे. पोलीस आणि बालकल्याण समिती तपासत आहेत की ही घटना दारिद्र्य व उपासमारीमुळे घडली आहे की, यामागे कोणताही संघटित गुन्हा आहे.
सामाजिक कार्यकर्ते आणि प्रशासन या प्रकरणावर विशेष लक्ष देत आहेत, तसेच मुलांच्या सुरक्षिततेसाठी तत्काळ उपाययोजना सुरू करण्यात आलेल्या आहेत. या घटनेने नाशिक जिल्ह्यातील जनतेमध्ये मोठा धक्का निर्माण केला असून, प्रशासनावर दबाव वाढला आहे की, अशा गंभीर परिस्थितीला टाळण्यासाठी भविष्यात योग्य धोरणे अमलात आणावीत.
