मूर्तिजापूर तालुक्यातील ‘सर्वांसाठी घर‘ योजनेत धक्कादायक गैरप्रकार उघडकीस आला आहे. तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींमध्ये घरकुल मंजुरी प्रक्रियेत पात्र लाभार्थ्यांना दुर्लक्षित करत, अपात्र आणि बोगस व्यक्तींच्या नावाने घरकुले मंजूर करण्यात आल्याचा आरोप आहे. प्राप्त माहितीनुसार, घरकुल योजनेसाठी आवश्यक असलेल्या अटी व शर्तींची पूर्तता न करता अनेक बोगस लाभार्थ्यांच्या नावांचा समावेश करण्यात आला आहे. काही लाभार्थ्यांकडे आधीच पक्की घरे असूनही, कागदोपत्री ‘निल’ दाखवून त्यांना घरकुले दिल्या गेल्या आहेत.
त्याचबरोबर, पात्र लाभार्थी जे गरिब, भूमिहीन किंवा झोपडीत राहणारे आहेत, त्यांना वर्षानुवर्षे प्रतीक्षा यादीत ठेवण्यात येत आहे. तर काही अपात्र लोकांना काही दिवसांतच मंजुरी मिळत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे. कागदपत्रांची तपासणी न करता, जागेच्या पुराव्याशिवाय घरकुल बांधकामास मंजुरी देणे, विद्यमान घर छुपवणे आणि पक्की घरे असलेल्या व्यक्तींना लाभ मिळवून देणे, या प्रकारावर संतप्त नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, ग्रामसेवक, सरपंच आणि संबंधित विभागाचे अभियंते यांच्या संगनमताशिवाय इतका मोठा गैरप्रकार होणे अशक्य आहे. संतप्त नागरिकांनी जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला असून, सर्व मंजूर घरकुलांचे सामाजिक अंकेक्षण (सोशल ऑडिट) करण्याची मागणी केली आहे. दोषींवर योग्य ती कारवाई न झाल्यास, नागरिकांनी तीव्र आंदोलन करण्याची चेतावणी दिली आहे.
Related News
याप्रकरणी प्रशासनाचे पुढील पाऊल आणि दोषींवर गुन्हा दाखल केला जाईल की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
