मुर्तिजापूर एपीएमसीत कोटींचा गैरव्यवहार…! बाजार शुल्कासह सुमारे ९.९९ लाखांची थकबाकी ; ‘अ’ वर्ग परवाना धारकाविरुद्ध सिटी पोलिसांत तक्रार

एपीएमसी

मुर्तिजापूर – कृषी उत्पन्न बाजार समितीत (एपीएमसी) कोटींचा आर्थिक गैरव्यवहार उघडकीस आला आहे. ‘अ’ वर्ग परवाना धारकाने मागील तीन महिन्यांत ४,५२८.६६ क्विंटल सोयाबीनसह इतर धान्याची खरेदी केली; परंतु बाजार शुल्क आणि शासनाची देखरेख फी न भरता पसार झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. एकूण व्यवहार सुमारे १ कोटी ७५ लाख रुपयांचा असून, त्यातील बाजार शुल्क व देखरेख फी व कटा-मापाई शुल्क मिळून ९,९९,५६५ रुपयांची थकबाकी असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

बाजार समितीचे सचिव रितेश मडगे यांनी संबंधित खरेदीदाराविरुद्ध सिटी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, फौजदारी गुन्हा नोंदवून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तक्रारीनुसार, खरेदीदाराने अडत्यांमार्फत शेतकऱ्यांकडून माल घेतला; परंतु बाजार समिती, शासन व अडत्यांचे पैसे न भरता बाहेर विक्री केली, ज्यामुळे शेतकरी आणि बाजार व्यवस्थेवर परिणाम झाला.

जानेवारी २०२६ पर्यंत वारंवार सूचना दिल्या असतानाही, “कंपनीकडून पैसे मिळाल्यानंतर रक्कम भरणार” असे आश्वासन देत वेळकाढूपणा केला. १८ फेब्रुवारी रोजी झालेल्या बैठकीत २० फेब्रुवारीपर्यंत रक्कम भरण्याचे आश्वासन दिले; परंतु नंतर खरेदीदारांचे मोबाईल बंद आढळले आणि ठिकाण सोडल्याची माहिती मिळाली.

Related News

सिटी पोलिसांनी हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केले असून, जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सविस्तर तपास सुरू आहे. या घटनेमुळे बाजार समिती परिसरात खळबळ उडाली असून, शेतकरी, अडते व संबंधित पक्षांची थकबाकी तातडीने वसूल करण्याची गरज असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

– अजित जाधव, पोलिस निरीक्षक, शहर पोलिस ठाणे, मुर्तिजापूर

read also :  https://ajinkyabharat.com/big-jump-in-abb-india-ltd-share-dividend-of-29-59-rupees-declared/

Related News