अमरावती | अंजनगाव सुर्जी तालुक्यातील प्रसिद्ध भवानी देवस्थान मुरा देवी मंदिरात अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी करून भाविकांमध्ये खळबळ उडवून दिली आहे. ही घटना १९ जानेवारी २०२६ रोजी पहाटे सुमारे २ ते २.३० वाजताच्या दरम्यान घडली. मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी मंदिराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून गाभाऱ्यात प्रवेश केला आणि मौल्यवान दागिन्यांवर डल्ला मारला.
मुरा देवीच्या डोक्यावरील सोन्याचा मुकुट, सोन्याची नथणी, इतर सोन्याचे दागिने तसेच चांदीचे झुंबर चोरट्यांनी लंपास केले. एवढ्यावरच न थांबता, चोरट्यांनी मंदिर परिसरातील बाजूच्या विठ्ठल-रुक्माई मंदिरातही प्रवेश केला. तेथे विठ्ठल व रुक्माई यांच्या डोक्यावरील सोन्याचा मुकुट तसेच काही चांदीचे दागिने चोरीस गेले. याशिवाय मंदिरातील दानपेटीही फोडण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.
ही संपूर्ण चोरीची घटना मंदिर परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मात्र, अद्याप चोरट्यांची स्पष्ट ओळख पटलेली नसून फुटेजच्या आधारे तपास सुरू आहे. चोरीची माहिती सकाळी पुजारी व ग्रामस्थांना मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. भाविकांनी मोठ्या संख्येने मंदिरात गर्दी केली होती.
Related News
घटनेची माहिती मिळताच रहिमापूर पोलीस ठाण्याचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून तपासाला सुरुवात केली असून फॉरेन्सिक पथकानेही घटनास्थळी पाहणी करून महत्त्वाचे पुरावे गोळा केले आहेत. देवस्थानचे अध्यक्ष साहेबराव पखाण यांनी प्राथमिक अंदाजानुसार सुमारे चार लाख रुपयांचा ऐवज चोरीस गेल्याचे सांगितले आहे.
प्रसिद्ध आणि श्रद्धेचे केंद्र असलेल्या मुरा देवी मंदिरात घडलेल्या या चोरीमुळे सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मंदिर परिसरात रात्रीच्या वेळी पुरेशी सुरक्षा नसल्याने चोरट्यांनी ही संधी साधल्याची चर्चा होत आहे. पोलिसांकडून लवकरच चोरट्यांना अटक करण्यात येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत असून भाविकांनीही तपासाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
