सोनटक्के प्लॉट परिसरात स्वच्छता विभागावर तुटून पडले, खडेबोल सुनावले
अकोला : पश्चिम अकोला विधानसभा मतदारसंघातील सोनटक्के प्लॉट परिसरात शुक्रवारी दुपारी आ. साजिद खान पठाण यांनी आकस्मिक दौरा केला
असता परिसरात प्रचंड घाणीचे साम्राज्य आढळले. ठिकठिकाणी साचलेला कचरा, तुडुंब भरलेल्या नाल्या आणि दुर्गंधी पाहून आ. पठाण यांचा पारा चांगलाच चढला.
त्यांनी तत्काळ मनपा स्वच्छता विभागाचे अधिकारी, कंत्राटदार आणि निरीक्षकांना बोलावून खडेबोल सुनावले.नागरिकांनी तक्रारी मांडताना सांगितले की,
कचरा घंटागाडी आठ दिवसात एकदाच येते. पडीक वार्ड असतानाही येथे मोजकेच चार सफाई कर्मचारी थातूरमातूर काम करतात.
यावर संताप व्यक्त करत आ. पठाण यांनी मनपा निरीक्षक आणि कंत्राटदारांना कानउघाडणी केली.
“यापुढे मंजूर असलेले सर्व कर्मचारी येथे तातडीने लावा, अन्यथा कंत्राटदार बदलला जाईल,” असा सज्जड इशारा त्यांनी दिला.
त्याचबरोबर परिसरातील लोमकळलेल्या वीजतारा व केबल्सबाबत महावितरण अधिकाऱ्यांना बोलावून तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.
स्वच्छता विभागाची तातडीची बैठक
जैन समाजाच्या पर्यूषण पर्वानिमित्त आ. पठाण यांच्याकडे विनंती करण्यात आली की या काळात शहरात मांस विक्री अथवा जीवहत्या होऊ नये.
त्यानुसार त्यांनी लगेच दुपारी चार वाजता मनपा सभागृहात स्वच्छता विभागाची तातडीची बैठक घेतली.बैठकीत त्यांनी मंदिर परिसरासमोर अतिक्रमण नसावे,
स्वच्छता राखावी, तसेच आगामी गणेशोत्सव व ईद मिलादुन्नबी दरम्यान संपूर्ण शहर स्वच्छतेत आदर्श दाखवेल याची दक्षता घ्यावी, अशा सूचना दिल्या.
या बैठकीस उपआयुक्त गीता ठाकरे, विभाग प्रमुख आणि स्वच्छता निरीक्षक उपस्थित होते.
Read also : https://ajinkyabharat.com/bordit-unique-venture-balankabat-garhwancha-poa/