Pune Crime: केतन अग्रवाल हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासे; लोहगडावर आधीच केला होता खुनाचा सराव, गुगलवर शोधून आखला मास्टरप्लॅन
पुण्यातील बहुचर्चित केतन अग्रवाल हत्या प्रकरणात पोलिस तपासादरम्यान एकामागून एक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी अटक केलेल्या सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांची समोरासमोर बसवून चौकशी केली असता, त्यांनी खून करण्यासाठी अत्यंत बारकाईने आखलेला कट उघड झाला आहे. तपासानुसार, केतनला लोहगड किल्ल्यावरून दरीत ढकलण्यापूर्वी आरोपींनी गुगलवर माहिती शोधली, प्रत्यक्ष किल्ल्यावर जाऊन जागेची पाहणी केली आणि अगदी खून कसा करायचा याचा सरावदेखील केला होता.
या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून, समाजात संतापाची लाट उसळली आहे. गहुंजे येथील लोढा सोसायटी परिसरात अग्रवाल समाजाच्या वतीने केतन अग्रवाल यांना न्याय मिळावा आणि आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, या मागणीसाठी मूक मेणबत्ती मोर्चा काढण्यात आला.
Related News
लोहगडावर आखला गेला होता मृत्यूचा प्लॅन
पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी केतन अग्रवालचा खून अपघातासारखा भासावा यासाठी विशेष तयारी केली होती. यासाठी त्यांनी इंटरनेटवर विविध माहिती शोधली. लोहगड किल्ल्यावर कोणत्या ठिकाणाहून एखाद्या व्यक्तीला ढकलल्यास तो अपघात वाटेल, कोणत्या ठिकाणी कमी गर्दी असते आणि पोलिस तपासापासून कसे बचावता येईल, अशा विविध बाबींचा अभ्यास करण्यात आला.
याचबरोबर त्यांनी प्रत्यक्ष किल्ल्यावर जाऊन संभाव्य ठिकाणांची पाहणी केली आणि तेथील परिस्थितीचा अंदाज घेतला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपींनी प्रत्यक्ष धक्का देण्याचाही सराव केला होता.
दिवाळी पार्टीत झाली ओळख, नंतर प्रेमसंबंध
चौकशीतून समोर आलेल्या माहितीनुसार, सिया गोयल आणि चेतन चौधरी यांची पहिली भेट गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात दिवाळी पार्टीमध्ये झाली होती. या ओळखीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाले.
दरम्यान, सियाच्या कुटुंबीयांनी तिच्या लग्नासाठी स्थळ पाहण्यास सुरुवात केली. परदेशातून उच्च शिक्षण घेऊन परतलेला आणि एका नामांकित कंपनीत संचालक म्हणून कार्यरत असलेल्या केतन अग्रवाल यांचे स्थळ सियासाठी आले. प्रतिष्ठित कुटुंब असल्याने घरच्यांच्या इच्छेखातर सियाने या लग्नाला होकार दिला. दोघांचा साखरपुडाही पार पडला.
मात्र, चेतनसोबतचे प्रेमसंबंध कायम असल्याने सियाला हे लग्न मान्य नव्हते. उघडपणे विरोध करता येत नसल्यामुळे केतनला कायमचा हटवण्याचा कट आखण्यात आल्याचा पोलिसांचा दावा आहे.
WhatsApp लोकेशन, चॅट डिलीट आणि मास्टरप्लॅन
३१ मे रोजी सिया आणि केतन लोहगड किल्ल्यावर फिरण्यासाठी गेले होते. त्यावेळीच सियाच्या मनात दरीत ढकलून अपघाताचा बनाव करण्याची कल्पना आली.
यानंतर तिने किल्ल्यावरील विविध ठिकाणांचे लोकेशन चेतनला व्हॉट्सॲपवर पाठवले. विशेष म्हणजे, दोघेही प्रत्येक संभाषणानंतर चॅट डिलीट करत असल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.
लोहगड : पहिला प्रयत्न फसला, दुसऱ्या प्रयत्नात यश
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपींनी १४ जून रोजी केतनला दरीत ढकलण्याचा पहिला प्रयत्न केला होता. मात्र, त्या दिवशी त्यांचा प्रयत्न यशस्वी झाला नाही.त्यानंतर त्यांनी पुन्हा योजना आखली. १८ जून रोजी चेतनने स्वतःचा मोबाईल दुकानात ठेवून दुसऱ्या व्यक्तीचा मोबाईल घेतला. पोलिसांना लोकेशन मिळू नये यासाठी हा डाव आखण्यात आला होता.
किल्ल्यावर जाताना त्याने अंगावर हुडी घालून चेहरा झाकला. किल्ल्यावर पोहोचल्यानंतर हुडी पिशवीत ठेवली आणि घटना घडवल्यानंतर पुन्हा हुडी घालून खाली उतरल्याची माहिती तपासातून समोर आली आहे.
लोहगड : केतनला दरीत ढकलल्यानंतर आईलाच पहिला फोन
घटना घडल्यानंतर सियाने सर्वप्रथम चेतन सुरक्षितपणे तेथून निघून गेल्याची खात्री केली. त्यानंतर तिने सर्वात आधी स्वतःच्या आईला फोन केला.पोलिसांच्या तपासानुसार, काही वेळानंतर तिने रडण्याचा आणि मदतीसाठी ओरडण्याचा बनाव केला, जेणेकरून संपूर्ण घटना अपघात असल्याचे भासवता येईल.
कुटुंबीयांचीही चौकशी
या प्रकरणात सिया गोयलच्या भावाची तब्बल दहा तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर तिच्या आई-वडिलांचीही पाच तासांहून अधिक काळ कसून चौकशी करण्यात आली.खुनाच्या कटाची पूर्वकल्पना कुटुंबातील इतर सदस्यांना होती का, आरोपींना कोणाची मदत मिळाली होती का आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाला का, या सर्व बाबींचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
अग्रवाल समाजात संताप
केतन अग्रवाल यांच्या हत्येनंतर अग्रवाल समाजामध्ये संतापाचे वातावरण आहे. आरोपींना कठोर शिक्षा मिळावी, यासाठी गहुंजे परिसरात मूक मेणबत्ती मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या प्रकरणाचा तपास जलदगतीने पूर्ण करून दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी करण्यात आली.
पोलिस तपास सुरूच
लोणावळा ग्रामीण पोलिस या प्रकरणातील डिजिटल पुरावे, मोबाईल लोकेशन, सीसीटीव्ही फुटेज, व्हॉट्सॲप डेटा आणि इतर तांत्रिक बाबींची तपासणी करत आहेत. तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे या प्रकरणातील आणखी धक्कादायक खुलासे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
