अकोला :- जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून मोटारसायकल चोरीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ होत असताना, स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी), अकोला यांनी प्रभावी आणि कौशल्यपूर्ण कारवाई करत मोटारसायकल चोरी करणाऱ्या टोळीला अटक केली आहे. या कारवाईत एकूण ७ मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून, सुमारे ६ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या यशस्वी कारवाईमुळे शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
पोलीस स्टेशन सिव्हील लाईन, अकोला येथे दिनांक २० डिसेंबर २०२५ रोजी राहुल पुंडलिक ढाकरे (वय ३०, रा. मच्छींद्र नगर, लहान उमरी, अकोला) यांनी मोटारसायकल चोरीची तक्रार दाखल केली होती. त्यांनी १९ डिसेंबर २०२५ रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास आपली एचएफ डीलक्स (एमएच-२७-डीएन-२२३५) ही मोटारसायकल घरासमोर उभी करून झोप घेतली होती. मात्र दुसऱ्या दिवशी पहाटे सुमारे ५.३० वाजता उठल्यानंतर सदर मोटारसायकल जागेवर आढळून आली नाही. आजूबाजूच्या परिसरात शोध घेऊनही वाहन न सापडल्याने त्यांनी पोलिसांत धाव घेतली. त्यानुसार अप.क्र. ५०५/२०२५, कलम ३०३(२) बीएनएस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला. एलसीबी पथकाने तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज तसेच गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला. तपासादरम्यान आरोपी वाशिम परिसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली. त्यात राम विठ्ठलसिंह ठाकुर (२३), सुरज रविंद्र लांडेकर (१८) आणि प्रकाश रवि जाधव (१८) तिघेही रा. वाशिम येथील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले असून, त्यांना अटक करण्यात आली.
Related News
सखोल चौकशीत आरोपींनी संगनमताने अकोला शहरातील विविध भागांतून ६ मोटारसायकल तसेच शेगाव (जि. बुलढाणा) येथून १ मोटारसायकल अशी एकूण ७ मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली. चोरी केलेली वाहने वाशिम येथे नेऊन कमी किमतीत विक्री करण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्यांना अटक केली.
आरोपींकडून वेगवेगळ्या कंपन्यांच्या ७ मोटारसायकल तसेच ३ मोबाईल फोन असा एकूण ६ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे अकोला व परिसरातील ७ मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी आणि पोलीस निरीक्षक शंकरराव शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपास पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक गोपाळ जाधव, विष्णू बोडखे, माजीद पठाण तसेच इतर अधिकारी व कर्मचारी सहभागी होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या या यशस्वी कारवाईमुळे मोटारसायकल चोरीच्या घटनांवर आळा बसण्यास मदत होणार असल्याचे नागरिकांमध्ये चर्चिले जात आहे.
