काबुलहून दिल्लीला विमानाच्या चाकाजवळ बसून १३ वर्षीय मुलाचा प्रवास
नवी दिल्ली : अफगाणिस्तानातून भारतात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काबुल विमानतळावरून दिल्लीला येणाऱ्या विमानाच्या चाकाजवळ बसून तब्बल 94 मिनिटांचा प्रवास एका 13 वर्षीय मुलाने केला. विमान दिल्लीच्या टर्मिनल-3 वर उतरल्यावर हा मुलगा जिवंत असल्याचे पाहून डॉक्टर आणि अधिकाऱ्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला.अधिकाऱ्यांनी सांगितले की, हा मुलगा प्रवाशांच्या मागे गाडी घेऊन काबुल विमानतळात शिरला. त्यानंतर व्हील बेसमध्ये लपून बसला. त्याचा उद्देश इराणला जाण्याचा होता, मात्र चुकून तो दिल्लीच्या विमानात शिरला. भारतीय वेळेनुसार सकाळी 8.46 वाजता विमान काबुलहून उडाले आणि 10.20 वाजता दिल्लीला उतरले. या संपूर्ण प्रवासात तो विमानाच्या चाकाजवळ लपलेला होता.
जीवंत राहणे कसे शक्य झाले?
तज्ज्ञांच्या मते, व्हील बेसमध्ये प्रवास करणे अशक्यप्राय असते. 30 हजार फूट उंचीवर तापमान -40°C ते -60°C पर्यंत खाली जाते, तर ऑक्सिजनची पातळी धोकादायकरीत्या कमी होते. अशा स्थितीत काही मिनिटांत मृत्यू होण्याची शक्यता असते. कॅप्टन मोहन रंगनाथन यांनी सांगितले की, मुलगा कदाचित व्हील बेसमधील एखाद्या बंद जागेत घुसला असावा, जिथे दबाव आणि तापमान प्रवासी केबिनसारखे राहिले असावे. त्यामुळे त्याचा जीव वाचला असण्याची शक्यता आहे.चंदीगड पीजीआयएमईआरचे असोसिएट प्रोफेसर डॉ. रितिन मोहिंद्रा यांनी सांगितले की, अशा उंचीवर काही मिनिटांत शीतदंश आणि हायपोथर्मियामुळे मृत्यू होऊ शकतो. व्हील बेसमध्ये प्रवास करणाऱ्यांपैकी फक्त 20 टक्के लोक जिवंत राहतात.
याआधीही असे घडलेय
भारतीय विमानतळावर व्हील बेसमध्ये बसून प्रवास करण्याचे हे दुसरे प्रकरण आहे. 1996 मध्ये दिल्ली ते लंडन या उड्डाणात दोन भावंडांनी बोईंग 747 च्या व्हील बेसमध्ये प्रवास केला होता. त्यापैकी प्रदीप सैनी वाचला होता, तर विजय सैनीचा मृत्यू झाला होता.
read also : https://ajinkyabharat.com/ind-vs-pak-abhishek-shubmanchi/
