चंद्रपूर प्रतिनिधी
कोरपना – शेतकऱ्यांना वेळेत व योग्य भावात खते मिळावीत, तसेच पुरवठा सुरळीत राहावा, यासाठी कोरपना
तालुक्यातील कृषी केंद्रांची धडक तपासणी मोहीम सुरू आहे. तालुका कृषी अधिकारी गोविंद ठाकूर यांच्या
मार्गदर्शनाखाली व तालुका गुणनियंत्रक निरीक्षक मिलिंद ढोणे यांच्या नेतृत्वात ही मोहीम राबवली जात असून, गैरप्रकार करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
कृषी प्रधान म्हणून ओळख असलेल्या कोरपना तालुक्यात तब्बल ८० हून अधिक कृषी केंद्रे कार्यरत आहेत.
खत व कृषीमालांचा योग्य पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी वन-टू-वन पद्धतीने प्रत्येक केंद्राची तपासणी केली जात आहे.
तपासणीत तफावत आढळल्यास संबंधित विक्रेत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली जाणार असून, आवश्यक पूर्तता न केल्यास
त्यांच्या परवान्याच्या रद्दबाबत वरिष्ठ पातळीवर शिफारस केली जाईल.
आजअखेर तालुक्यातील ३० हून अधिक कृषी केंद्रांची तपासणी पूर्ण झाली आहे.
अद्यापपर्यंत शेतकऱ्यांकडून कुठलीही औपचारिक तक्रार प्राप्त झालेली नसली तरी कृषी विभागाने विशेष खबरदारी घेत मोहीम सुरू ठेवली आहे.
आगामी काळात उर्वरित कृषी केंद्रांचीही तपासणी होणार आहे.
Read also : https://ajinkyabharat.com/ministry-of-protection-of-protection/