केकेआरने कॅपिटल्सला धुळ चारत साकारला मोठा विजय

केकेआरने कॅपिटल्सला धुळ चारत साकारला मोठा विजय

कोलकाता : केकेआरच्या संघाने दिल्ली कॅपिटल्सचे सोमवारच्या सामन्यात पानीपत केल्याचे पाहायला मिळाले.

केकेआरने दिल्लीच्या फलंदाजीला वेसण घालत त्यांना १५३ धावांवर रोखले.

त्यानंतर फिल सॉल्टच्या धडाकेबाज सलामीच्या जोरावर सहजपणे हा सामना जिंकला. या विजयासह केकेआरच्या संघाने दोन गुण आपल्या पदरात पाडून घेतले आहेत.

Related News

केकेआरने यावेळी सात विकेट्स राखत दिल्लीवर दमदार विजय साकारला.

दिल्लीच्या १५४ धावांचा पाठलाग करताना केकेआरने पहिल्याच षटकात २३ धावांची लूट केली आणि आपले इरादे स्पष्ट केले.

केकेआरने पहिल्या ६ षटकांच्या पॉवर प्लेमध्ये एकही विकेट न गमावता ७९ धावांची भर घातली होती.

त्यावेळी केकेआरचा संघ हा सामना १० विकेट्स राखून जिंकणार की काय, अशी शक्यता निर्माण झाली होती.

पण सुनील नरिनच्या रुपात केकेआरला पहिला धक्का बसला. नरिनने यावेळी १५ धावा केल्या.

पण त्यावेळी फिल सॉल्ट तुफानी फटकेबाजी करत दिल्लीच्या गोलंदाजीची पिसे काढत होता.

सॉल्टने यावेळी २६ चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले, यामध्ये पाच चौकार आणि चार षटकारांचा समावेश होता.

केकेआरने ८.६ षटकांत आपले शतक पूर्ण केले आणि विजयाच्या दिशेने ठोस पाऊल टाकले.

पण शतकाला चार धावा बाकी असताना सॉल्ट बाद झाला आणि केकेआरला दुसरा धक्का बसला. सॉल्ट यावेळी आपले काम चोख निभावून परतला होता

सॉल्टने यावेळी फक्त ३३ चेंडूंत सात चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर ६८ धावांची खणखणीत खेळी साकारली.

सॉल्ट बाद झाल्यावर चार धावांच्या फरकाने रिंकू सिंगही बाद झाला, रिंकूला यावेळी ११ धावा करता आल्या.

पण त्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर आणि वेंकटेश अय्यर या दोघांनी संयतपणे फलंदाजी करत संघाला विजयासमीप नेले.

तत्पूर्वी, केकेआरच्या गोलंदाजांनी दुसऱ्या षटकापासूनच दिल्लीच्या धावसंख्येला लगाम लावण्याचे काम चोख बजावले.

केकेआरने पृथ्वी शॉ, ऋषभ पंत, शाय होप आणि स्ट्रीटियन स्टब्ससारख्या फलंदाजांना स्वस्तात बाद केले. दिल्लीचा संघ यावेळी शतक गाठणार की नाही, असे वाटत होते.

पण यावेळी संघाच्या मदतीला धावून आला तो कुलदीप यादव. कुलदीपने अखेरपर्यंत किल्ला लढवला आणि संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली.

कुलदीपने यावेळी २६ चेंडूंत पाच चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर नाबाद ३५ धावांची दिल्लीसाठी सर्वाधिक खेळी साकारली.

कुलदीपने यावेळी अखेरपर्यंत केकेआरच्या गोलंदाजीचा प्रतिकार केला. त्यामुळेच दिल्लीच्या संघाला २० षटकांत १५३ अशी धावसंख्या तरी उभारता आली.

Also Read: https://ajinkyabharat.com/possibility-of-disruption-of-banking-services-to-bank-employees/

 

Related News