यवतमाळ : नागपूरमधील प्रसिद्ध कंत्राटदार पी. व्ही. वर्मा यांच्या आत्महत्या प्रकरणात नागपूर पोलिसांनी मोठी कारवाई करत, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाचे पुसद येथील नेते आणि पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद मैंद यांना अटक केली आहे. या धडक कारवाईने विदर्भाच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाचे कंत्राटदार पेनमाचा वेंकटेश्वर (पी.व्ही.) वर्मा उर्फ मुन्ना वर्मा (वय ६१) यांनी १ सप्टेंबर रोजी नागपूरच्या राजनगर येथील आपल्या फ्लॅटमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती. शासकीय कामांची कोट्यवधी रुपयांची बिले थकल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज होता. मात्र, पोलिसांच्या सखोल तपासात या प्रकरणाला एक धक्कादायक आणि गुन्हेगारी वळण मिळाले. वर्मा यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत आणि इतर पुराव्यांवरून, अवैध सावकारी आणि कर्जाच्या वसुलीसाठी लावलेल्या तगाद्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले.या प्रकरणात पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून दोन आरोपींना अटक केली. यातील प्रमुख आरोपी शरद मैंद, जे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते असून त्यांनी विधानसभा निवडणूकही लढवली होती, त्यांना यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथून अटक करण्यात आली. वर्मा यांनी मैंद अध्यक्ष असलेल्या पुसद अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेतून मोठे कर्ज घेतले होते.तर या प्रकरणातील दुसरा आरोपी मंजीत वाडे हा अवैध सावकारीचा व्यवसाय करत होता. त्याने वर्मा यांना मोठ्या व्याजाने कर्ज देऊन वसुलीसाठी प्रचंड तगादा लावला होता, ज्यामुळे वर्मा मानसिकदृष्ट्या पूर्णपणे खचले होते. या दोघांच्या त्रासाला कंटाळूनच वर्मा यांनी आपले जीवन संपवल्याचे तपासात समोर आले आहे. या हाय-प्रोफाइल अटकेमुळे पुसद शहरासह संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात आणि विदर्भाच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक कसून तपास करत आहेत.
read also : https://ajinkyabharat.com/guidance-mandar-strategy/