प्रचारादरम्यान कंगनाची घोषणा मोठी; मी मंडीतून खासदार झाले तर…

प्रचारादरम्यान कंगनाची घोषणा मोठी

शिमला: हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर लढत असलेल्या अभिनेत्री कंगना रणौतनं मोठी घोषणा केली आहे. सध्या कंगना मंडीमध्ये जोरदार प्रचार करत आहे. या मतदारसंघातून आपण निवडून येऊ, असा विश्वास तिनं व्यक्त केला. तिनं चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीबद्दल मोठी घोषणाही केली.

लोकसभा निवडणुकीत यश मिळाल्यास, खासदार झाल्यास मी हळूहळू चित्रपट क्षेत्रातून बाहेर पडेन. कारण मला एकाच कामावर लक्ष केंद्रित करायचं आहे, असं कंगनानं ‘आज तक’ वृत्तवाहिनीला सांगितलं. चित्रपट क्षेत्र आणि राजकारण यांचा समतोल कसा साधणार असा प्रश्न कंगनाला विचारण्यात आला. त्यावर ‘मी चित्रपटसृष्टीतही कंटाळते. मी भूमिका साकारते. दिग्दर्शनही करते. मला राजकारणात शक्यता दिसल्यास, जनता मला उत्तम प्रतिसाद देत असल्यास, मी पूर्ण वेळ राजकारणच करेन. मी एकावेळी एकच काम करेन,’ असं उत्तर कंगनानं दिलं.

लोकांना माझी गरज असल्याचं लक्षात आल्यास मी त्याच दिशेनं जाईन. मी मंडीतून जिंकल्यास राजकारणच करेन. अनेक चित्रपट निर्मात्यांनी मला राजकारणात न जाण्याचा सल्ला दिला. तुम्हाला लोकांच्या आशा पूर्ण कराव्या लागतात. माझ्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षेचा फटका लोकांना बसल्यास ते योग्य होणार नाही. मी एक अतिशय उत्तम आयुष्य जगले आहे. आता मला लोकांसोबत काम करण्याची संधी मिळत आहे. त्यामुळे मी त्या संधीचं सोनं करेन. लोकांना तुमच्याकडून अपेक्षा असतील, तर त्या पूर्ण करायला हव्यात. लोकांना न्याय द्यायला हवा, असं कंगना म्हणाली.

Related News

चित्रपटांपेक्षा राजकीय आयुष्यात किती फरक जाणवतो, असा प्रश्न कंगनाला विचारला गेला. त्यावर फिल्मी दुनिया खोटी असल्याचं कंगना म्हणाली. ‘तिथे एक वेगळं वातावरण तयार केलं जातं. एक बबल तयार करण्यात येतं. लोकांना आकर्षित करण्यासाठी बबलची निर्मिती केली जाते. पण राजकारणात वास्तव दिसतं. समाजकार्याच्या क्षेत्रात मी नवीव आहे. राजकारणात नवी आहे. लोकांच्या अपेक्षा पूर्ण करायचा माझा प्रयत्न असेल,’ असं कंगनानं सांगितलं.

Related News