कांद्यानं केला वांदा! केंद्रीय मंत्र्यांना धास्ती, भुजबळांकडे धाव

कांद्यानं केला वांदा! केंद्रीय मंत्र्यांना धास्ती, भुजबळांकडे धाव

नाशिक : महायुतीच्या जागावाटपात नाशिकचा पेच कायम असताना भाजपच्या दिंडोरी मतदारसंघाच्या उमेदवार आणि केंद्रीय राज्यमंत्री भारती पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली. भुजबळ फार्मवर दोन्ही नेत्यांची भेट घेतली. दिंडोरीत सहकार्य करण्याचं आवाहन पवारांनी भुजबळांना केल्याचं समजतं. नाशिकमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न मोठा आहे. त्यामुळे दिंडोरीत लक्ष घालण्याची विनंती पवारांनी भुजबळांकडे केली.

गुजरातच्या पांढऱ्या कांद्याला निर्यातीची परवानगी देणाऱ्या केंद्र सरकारनं महाराष्ट्रातील लाल कांद्याला मात्र निर्यातबंदी केली. त्यामुळे नाशिकमधील कांदा उत्पादक शेतकरी संतापले. शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली. कांदा पिकूनही सरकारच्या धोरणांमुळे शतकऱ्यांवर रडण्याची वेळ आली. विरोधकांनीदेखील हा मुद्दा लावून धरला. त्यामुळे मग केंद्रानं बांगलादेश, श्रीलंकेसह सहा देशांना ९९ हजार १५० टन कायदा निर्यातीची परवानगी दिली. शनिवारी हा निर्णय घेण्यात आला. पण ही घोषणा जुनीच असल्याचं शेतकरी नेत्यांचं म्हणणं आहे. सरकारनं मात्र हा निर्णय नवीन असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे संभ्रम निर्माण झाला.

भारती पवारांची अडचण काय?
दिंडोरीत विधानसभेच्या सहा जागा येतात. नांदगाव, कळवण, चांदवड, येवला, निफाड, दिंडोरी या सहाही मतदारसंघात कांदा पिकतो. कांदा हीच या मतदारसंघाची ओळख आहे. हेच इथलं प्रमुख पीक आहे. केंद्र सरकारच्या धोरणांमुळे दिंडोरी लोकसभा मतदारसंघात रोष आहे. शेतकऱ्यांचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं आहे. याचा फटका भारती पवारांना बसू शकतो. भारती पवारांविरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून भास्कर भगरे मैदानात आहेत. प्रत्येक भाषणात ते कांदा प्रश्नाचा उल्लेख करतात. त्यांना चांगला प्रतिसादही मिळतो. त्यामुळे भारती पवारांची धाकधूक वाढली आहे.

Related News

पवारांच्या मागे भुजबळांचं बळ?
केंद्र सरकारच्या धोरणाबद्दल शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. स्थानिक खासदार भारती पवार केंद्रात मंत्री असूनही त्यांना हा प्रश्न सोडवता न आल्यानं शेतकऱ्यांचा रोष जास्त आहे. त्याच पार्श्वभूमीवर भारती पवारांनी आज भुजबळांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. नाशिकचे पालकमंत्री राहिलेल्या भुजबळांचं जिल्ह्यावर चांगलं वर्चस्व आहे. ते राज्यात मंत्री आहेत. वरिष्ठ नेते आहेत. त्यामुळे त्यांनी या प्रकरणात लक्ष घातल्यास शेतकऱ्यांचा रोष कमी होईल अशी आशा पवार यांना आहे.

Related News