रिसोड (जि. वाशिम) –रिसोड तालुक्यातील पिंपरी सरहद येथे पावसामुळे रस्त्यांची झालेली दयनीय अवस्था
पाहणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांच्या वाहनचालकाने पत्रकार फिरोज शहा यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
चालकाने दगड उगारून अंगावर धाव घेतल्याची ही गंभीर घटना घडली.
या प्रकरणाचा निषेध व्हॉइस ऑफ मीडिया या राज्यस्तरीय पत्रकार संघटनेने नोंदवला आहे.
21 ऑगस्ट रोजी तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर व ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांना संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, राज्यात सातत्याने पत्रकारांवर हल्ल्यांचे प्रकार वाढत आहेत.
नुकतेच अहमदनगर व अकोला जिल्ह्यातील घटनांची श्याही वाळण्याआधीच वाशिम जिल्ह्यातही पत्रकारांवर हल्ल्याचा प्रकार घडला आहे.
पत्रकार फिरोज शहा यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांचा फोटो काढल्यामुळेच वाहनचालक संतापला व जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी मात्र या घटनेकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
पत्रकार हे लोकशाहीचा चौथा स्तंभ असून त्यांच्यावर होत असलेले वारंवार हल्ले ही अत्यंत निदनीय बाब आहे.
संबंधित वाहनचालकावर पत्रकार संरक्षण कायद्यान्वये तात्काळ गुन्हा दाखल करावा, अशी मागणी व्हॉइस ऑफ मीडियाने केली आहे.
निवेदन देताना संघटनेचे तालुका अध्यक्ष विनोद पाटील बोडखे, रुपेश पाटील बाजड, महादेव घुगे, वसंता खडसे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
Read also : https://ajinkyabharat.com/swami-vivekananda-shetkari-producer-gutcha-undertaking/