मुंबई : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीमुळे राजकारण तापले आहे. सर्व नेते जोरदार प्रचाराला लागले असून प्रचारासाठी अवघा एक आठवडा बाकी राहिला आहे.
त्यामुळे प्रचार सभा व बैठका वाढल्या आहेत. दिल्लीतील नेते प्रचारासाठी राज्यामध्ये आले आहेत.
त्यामुळे आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.
Related News
यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
विधानसभा निव़डणुकींमध्ये गुंडाचा वापर केला जात असल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले की, “राज ठाकरे जिथे भाषण करुन गेले, तिथे अंडरवर्ल्डच्या मदतीने निवडणूक लढवली जात आहे.
मुंबईतल्या अनेक मतदारसंघात ठाण्यात, पुण्यात अनेक नामचीन गुन्हेगार ज्यांचा कधीकाळी अंडरवर्ल्ड टोळ्यात सहभाग होता,
मी त्यांची नाव देऊ शकतो, अनेक असे गुंड आहेत, मी त्यांचं नाव देईन.
आम्ही राजकीय पक्ष निरीक्षक, संपर्कप्रमुख नेमतो, तशा या गुंड टोळ्यांच्या मोहोरक्यांवर विधानसभेची जबाबदारी दिली आहे.
कांजूरमार्ग, विक्रोळी, भांडूप, दादर असेल ठाणे शहर असेल या ठिकाणी ठरवून गुंड घेण्यात आले आहेत.
काही लोकांचा त्यासाठी जामिन करुन घेतला आहे,” असा घणाघात खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
पुढे खासदार राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा साधला आहे. खासदार राऊत म्हणाले की,
“आयपीएस अधिकारी व गुंडाच्या रात्रीच्या वर्षा बंगल्यावर बैठका होतात. मुंबईतील अनेक मतदारसंघामध्ये गुंडांना सांगून ठेवण्यात आले आहे.
संपर्कप्रमुख नेमल्याप्रमाणे हे गुंड मतदारसंघांमध्ये नेमण्यात आले आहेत. हा मोहऱ्याकांवर विधानसभेची जबाबदारी देण्यात आली आहे.
सत्यनारायण चौधरींनी यादी मागितली, तर मी त्यांना गुंडांची यादी द्यायला तयार आहे.
कोणत्या अधिकाऱ्यांना कोणत्या गुंडांना मदत करण्यासाठी वर्षावरुन काय सूचना येत आहेत, हे सत्यनारायण चौधरीं इतकं कोणाला माहित नाही.
तुम्ही कोणासाठी काम करताय? मी नाव देऊ का तुम्हाला मिस्टर चौधरी?” असा सवाल संजय राऊत यांनी मुंबईचे जॉईंट कमिशनर यांना केला आहे.
पोलिसांना देखील संजय राऊत यांनी इशारा दिला आहे. ते म्हणाले की, “पोलीस गुंडांच्या मदतीने आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करत असतील,
तर मविआ याची गांभीर्याने नोंद घेत आहे.
हे सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांनी लक्षात घ्यावं. या गुंडांकडून पोलीस आदेश घेतात. निवडणूक आयोगाला याची माहिती देणार आहे.
या गुंडांकडून पोलीस आदेश घेतात. मविआला मदत करणारे कार्यकर्ते त्यांना तडीपार करायचं, त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करायचे, त्यांना धमक्या द्यायच्या.
माझं कायदा-सुव्यवस्था संभाळणाऱ्या पोलिसांना आव्हान आहे, सरकार बदलत असतं.
सरकारं जात येत असतात. पोलीस खात्याला कलंक लावला जात आहे. पोलीस खात्याची बेअब्रू होत आहे. मिस्टर सत्य नारायण चौधरी तुमच्या खाली काय जळतय हे बघा.
मला जास्त बोलायला लावू नका. सरकार बदलत असतं हे लक्षात घ्या, सरकार बदलणार या ,सगळ्याचा हिशोब केला जाईल,
” असा इशारा संजय राऊत यांनी पोलिसांना देखील दिला आहे. खासदार संजय राऊत यांच्या या नव्या गौप्यस्फोटामुळे राजकीय वर्तुळामध्ये एकच खळबळ उडाली आहे.