PM मोदी ज्यांच्या पाया पडले ते 97 वर्षीय माखनलाल सरकार कोण? कोर्टात गायलं गाणं अन् न्यायाधीशांनीच दिलं First Class तिकीट
पश्चिम बंगालच्या राजकारणात शनिवारी एक ऐतिहासिक क्षण पाहायला मिळाला. बंगालमध्ये पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेत आल्यानंतर सुवेंदू अधिकारी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या भव्य शपथविधी सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. मात्र, या कार्यक्रमात सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते एका 97 वर्षीय ज्येष्ठ कार्यकर्त्याने. पंतप्रधान मोदी यांनी सर्वांसमोर त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले आणि त्यांना मिठी मारली. ते व्यक्तिमत्त्व म्हणजे माखनलाल सरकार.
राजकीय क्षेत्रात अनेक नेते येतात आणि जातात, पण काही व्यक्ती आपल्या निष्ठा, संघर्ष आणि राष्ट्रप्रेमामुळे इतिहासात कायमस्वरूपी स्थान निर्माण करतात. माखनलाल सरकार हे त्यापैकीच एक नाव मानले जाते. पश्चिम बंगालमधील सिलिगुडी येथे राहणारे माखनलाल सरकार हे भारतीय जनता पक्षाच्या सुरुवातीच्या काळातील सर्वात ज्येष्ठ आणि समर्पित कार्यकर्त्यांपैकी एक आहेत.
Related News
श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे विश्वासू सहकारी
माखनलाल सरकार यांची ओळख केवळ भाजपाचे ज्येष्ठ नेते म्हणून नाही, तर जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे अत्यंत निकटवर्तीय सहकारी म्हणूनही आहे. डॉ. मुखर्जी यांच्या प्रत्येक आंदोलनात ते सावलीप्रमाणे सोबत असायचे.
काश्मीरमध्ये तिरंगा फडकवण्याच्या आंदोलनादरम्यान 1952 मध्ये डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांना अटक करण्यात आली होती. त्या काळात माखनलाल सरकार हे देखील त्यांच्यासोबत होते. मुखर्जी यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर त्यांच्या अंतिम प्रवासातही माखनलाल सरकार सहभागी झाले होते. त्यामुळे स्वातंत्र्यानंतरच्या राष्ट्रवादी राजकारणाचे ते जिवंत साक्षीदार मानले जातात.
कोर्टात गायलं देशभक्ती गीत अन् घडलं अनोखं
माखनलाल सरकार यांच्या आयुष्यातील एक प्रसंग आजही भाजप कार्यकर्त्यांमध्ये अभिमानाने सांगितला जातो. काँग्रेसच्या काळात त्यांनी एका देशभक्तीपर गीताचे गायन केले होते. त्या गीतामुळे दिल्ली पोलिसांनी त्यांना अटक केली होती.
यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायाधीशांनी त्यांना माफी मागण्यास सांगितले. मात्र, माखनलाल सरकार यांनी ठामपणे सांगितले की, “मी कोणताही गुन्हा केलेला नाही. मी फक्त देशभक्तीपर गीत गायले आहे.”
त्यांनी माफी मागण्यास स्पष्ट नकार दिला. एवढेच नाही, तर न्यायाधीशांच्या विनंतीवरून त्यांनी तेच गीत पुन्हा न्यायालयात गायले. त्यांच्या आवाजातील राष्ट्रप्रेम आणि धाडस पाहून न्यायाधीशही भारावून गेले.
या घटनेनंतर न्यायाधीशांनी पोलिसांना आदेश दिले की, माखनलाल सरकार यांना सन्मानाने प्रथम श्रेणीचे रेल्वे तिकीट देऊन घरी सोडण्यात यावे. इतकेच नव्हे, तर प्रवासासाठी त्यांना 100 रुपयेही देण्यात आले. त्या काळात ही रक्कम मोठी मानली जात होती.
हा प्रसंग आजही त्यांच्या धैर्याचे आणि राष्ट्रनिष्ठेचे प्रतीक म्हणून सांगितला जातो.
भाजपाच्या विस्तारात मोठं योगदान
1980 मध्ये भारतीय जनता पक्षाची स्थापना झाल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये पक्षाची पाळेमुळे मजबूत करण्याचे मोठे काम माखनलाल सरकार यांनी केले. पश्चिम दिनाजपूर, जलपाईगुडी आणि दार्जिलिंग या भागांमध्ये त्यांनी संघटन उभारणीवर भर दिला.
केवळ एका वर्षात त्यांनी 10 हजारांपेक्षा अधिक सदस्यांची नोंदणी करून पक्षात नवी ऊर्जा निर्माण केली होती. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे आणि निष्ठेमुळे त्यांना सलग सात वर्षे जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली.
विशेष म्हणजे, भाजपामध्ये सामान्यतः एखाद्या व्यक्तीला दीर्घकाळ एकाच पदावर ठेवले जात नाही. मात्र, माखनलाल सरकार यांच्या प्रामाणिक कामामुळे पक्षाने त्यांच्यावर सातत्याने विश्वास दाखवला.
मोदींनी का केला सन्मान?
आज 97 वर्षांचे असूनही माखनलाल सरकार यांची पक्षनिष्ठा आणि राष्ट्रवादी विचारांप्रती असलेली बांिलकी कायम आहे. त्यांनी आयुष्यभर संघटन उभारणी, राष्ट्रभक्ती आणि कार्यकर्त्यांना प्रेरणा देण्याचे काम केले.
याच योगदानाचा गौरव म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सार्वजनिक मंचावर त्यांच्या पाया पडून सन्मान व्यक्त केला. या क्षणाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले असून देशभरात माखनलाल सरकार यांच्याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.
राजकारणात पद, सत्ता आणि प्रसिद्धीपेक्षा निष्ठा आणि विचारांशी प्रामाणिक राहणाऱ्या व्यक्तींना लोक आजही मान देतात, हे माखनलाल सरकार यांच्या उदाहरणातून पुन्हा अधोरेखित झाले आहे.
