‘कौन बनेगा करोडपती’ हा भारतीय टेलिव्हिजन इतिहासातील सर्वात लोकप्रिय आणि प्रतिष्ठित क्विझ शो मानला जातो. ज्ञान, आत्मविश्वास आणि धाडस यांच्या जोरावर सामान्य माणसालाही करोडपती बनवणाऱ्या या शोने अनेकांचे आयुष्य बदलले. 2000 साली सुरू झालेल्या ‘केबीसी’च्या पहिल्याच सिझनने देशभरात प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. अमिताभ बच्चन यांच्या दमदार सूत्रसंचालनामुळे आणि स्पर्धकांच्या प्रेरणादायी कथा यामुळे हा शो घराघरात पोहोचला.आज तब्बल 26 वर्षांनंतरही ‘केबीसी’ची जादू कायम आहे. मात्र या शोचा पहिला करोडपती ठरलेले हर्षवर्धन नवाथे आजही अनेकांच्या लक्षात आहेत. आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांनी एक कोटी रुपयांची रक्कम जिंकली आणि रातोरात देशभर प्रसिद्ध झाले. पण त्यांच्या खासगी आयुष्याविषयी फार कमी लोकांना माहिती आहे. हर्षवर्धन नवाथे यांची पत्नी ही मराठी मालिकांमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
ही अभिनेत्री म्हणजे सारिका नवाथे. सध्या ती ‘कमळी’ या लोकप्रिय मराठी मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारताना दिसते. अभिनय क्षेत्रात स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या सारिकाला आजही अनेकजण “केबीसीच्या पहिल्या विजेत्याची पत्नी” म्हणून ओळखतात. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने याविषयी मनमोकळेपणाने भाष्य केलं.सारिका नवाथे म्हणाली की, “केबीसीची लोकप्रियता इतकी मोठी आहे की, आजही लोक मला हर्षवर्धन नवाथे यांच्या पत्नी म्हणूनच ओळखतात. कधी कधी वाटतं की, त्या पलीकडेही माझी स्वतःची एक वेगळी ओळख आहे. कारण मीसुद्धा अनेक मराठी मालिकांमध्ये काम केलं आहे. मात्र हर्षवर्धन यांचा मला कायम अभिमान वाटतो.”
तिने दिलेल्या या प्रतिक्रियेनंतर सोशल मीडियावर पुन्हा एकदा हर्षवर्धन आणि सारिका नवाथे यांच्या चर्चेला उधाण आलं आहे. अनेकांनी या जोडप्याचं कौतुक करत त्यांच्या साधेपणाचंही अभिनंदन केलं.
Related News
हर्षवर्धन नवाथे यांचा प्रवासही अत्यंत प्रेरणादायी मानला जातो. त्यांचे वडील आयपीएस अधिकारी होते. त्यामुळे लहानपणापासूनच अभ्यास आणि शिस्तीचं वातावरण त्यांना मिळालं. हर्षवर्धन स्वतः सिव्हिल सर्व्हिस परीक्षेची तयारी करत होते. त्यांचं स्वप्न आयएएस अधिकारी बनण्याचं होतं. मात्र नियतीने त्यांच्यासाठी वेगळाच मार्ग निवडला होता.केबीसी’मध्ये सहभागी झाल्यानंतर त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. शोमध्ये त्यांनी शांतपणे आणि आत्मविश्वासाने प्रश्नांची उत्तरं दिली. अखेर त्यांनी एक कोटी रुपयांची ऐतिहासिक रक्कम जिंकली आणि देशातील पहिला KBC करोडपती होण्याचा मान मिळवला. त्या काळात एक कोटी रुपयांची रक्कम ही प्रचंड मोठी मानली जात होती. त्यामुळे हर्षवर्धन रातोरात स्टार बनले.
मात्र प्रसिद्धी मिळाल्यानंतरही त्यांनी आपलं आयुष्य संयमाने जगण्याचा निर्णय घेतला. ‘बीबीसी’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं होतं की, “मला मिळालेल्या पैशांची मी योग्य गुंतवणूक केली. काही पैसे पुढील शिक्षणासाठी खर्च केले. शिक्षणासाठी मी परदेशातही गेलो. त्या काळात मला अभिनय आणि मॉडेलिंगच्या अनेक ऑफर्स मिळाल्या होत्या. पण मी मला योग्य वाटेल तोच मार्ग निवडला.”
हर्षवर्धन यांनी प्रसिद्धीचा वापर फक्त ग्लॅमर किंवा मनोरंजनासाठी न करता स्वतःच्या करिअर घडवण्यासाठी केला. त्यामुळेच आजही त्यांचं उदाहरण अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी मानलं जातं.
तथापि, आयएएस अधिकारी बनण्याचं त्यांचं स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही. याची खंत त्यांनी एका मुलाखतीत व्यक्त केली होती. “आयुष्य तुमच्याकडून काही गोष्टी हिरावून घेतं आणि बदल्यात काही नवीन गोष्टी देतं. केबीसीचा अनुभव माझ्यासाठी तसाच होता. मला पैसा आणि प्रसिद्धी मिळाली, पण आयएएस होण्याचं माझं स्वप्न अधुरंच राहिलं,” असं ते म्हणाले होते.
आज हर्षवर्धन आणि सारिका नवाथे हे आपल्या कुटुंबासोबत आनंदाने आयुष्य जगत आहेत. त्यांच्या कुटुंबात दोन मुलांचाही समावेश आहे. दोघंही आपापल्या क्षेत्रात यशस्वी असून सोशल मीडियावरही त्यांच्या पोस्टला चाहत्यांकडून मोठा प्रतिसाद मिळत असतो.दरम्यान, ‘कमळी’ मालिकेमुळे सारिका नवाथे पुन्हा चर्चेत आली आहे. तिच्या अभिनयाचं प्रेक्षकांकडून कौतुक होत असून, तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
KBC चा पहिला करोडपती आणि मराठी मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री अशी ही जोडी आजही अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. ज्ञान, मेहनत आणि संयम यांच्या जोरावर यश मिळवता येतं, हे हर्षवर्धन नवाथे यांनी सिद्ध करून दाखवलं. तर अभिनय क्षेत्रात स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करत सारिका नवाथे यांनीही आपली वेगळी छाप पाडली आहे.
