Indigo Crisis : इंडिगोच्या एका चुकीमुळं फ्लाईट धडाधड रद्द, देशभर गदारोळ; DGCA च्या निर्णयामुळं मिळणार दिलासा? A टू Z जाणून घ्या

Indigo Crisis

नवी दिल्ली: देशातील सर्वात मोठी एअरलाईन Indigo Crisis  सध्या मोठ्या संकटात सापडली असून, गेल्या चार दिवसांमध्ये तब्बल 1000 हून अधिक फ्लाईट रद्द कराव्या लागल्या आहेत. बुधवारी आणि गुरुवारी मिळूनच 450 पेक्षा जास्त उड्डाणे रद्द झाल्यामुळे देशभरातील विमानतळांवर प्रवाशांचा प्रचंड गोंधळ उडाला आहे. इंडिगोकडे देशातील सुमारे 65 टक्के प्रवासी वाहतुकीचा वाटा असल्यामुळे या गोंधळाचा सर्वाधिक फटका दिल्ली, बंगळुरू, हैदराबाद, मुंबईसह प्रमुख शहरांतील प्रवाशांना बसला आहे.

विविध विमानतळांवर उड्डाण रद्द होणे, तासन्‌तास विलंब, अचानक बदललेले वेळापत्रक आणि महाग झालेले तिकीटदर यामुळे हजारो प्रवासी अडकून पडले. अनेक प्रवाशांचे वैयक्तिक कार्यक्रम, कामाचे दौरे व महत्त्वाच्या भेटी रद्द झाल्या असून, सोशल मीडियावरही इंडिगोविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.

सॉफ्टवेअर अपडेटपासून गोंधळाची सुरुवात

या संपूर्ण संकटाची सुरुवात झाली ती एअरबस A320 विमानांमध्ये करण्यात आलेल्या सॉफ्टवेअर अपडेटमुळे. अपडेशनमध्ये आलेल्या तांत्रिक ग्लिचमुळे काही फ्लाईट्स आधी रद्द झाल्या. त्यानंतर परिस्थिती आणखी बिकट झाली कारण Flight Duty Time Limitation (FDTL) नियम प्रत्यक्षात लागू झाले.

Related News

फ्लाईट रद्द होण्यामागची नेमकी कारणं

इंडिगोकडून फ्लाईट रद्द करण्यामागे वेगवेगळी कारणं सांगण्यात आली.
त्यामध्ये —
• सॉफ्टवेअर ग्लिच
• हिवाळी वेळापत्रकातील बदल (Winter Schedule)
• खराब हवामान
अशी कारणे पुढे करण्यात आली.

मात्र, हवाई उद्योगातील तज्ज्ञांच्या मते, या सर्वांमध्ये सर्वात मोठं कारण म्हणजे FDTL नियमांची अचानक आणि कडक अंमलबजावणी.

FDTL नियमामुळे काय बदलले?

जानेवारी 2024 मध्ये जाहीर करण्यात आलेले FDTL नियम प्रत्यक्षात 1 नोव्हेंबर 2025 पासून लागू झाले. या नियमांनुसार पायलट व क्रूच्या कामाच्या व विश्रांतीच्या वेळेवर कडक मर्यादा घालण्यात आल्या —

  • आठवड्याची साप्ताहिक सुट्टी 36 तासांवरून वाढवून 48 तास करण्यात आली.

  • आठवड्यातील नाईट लँडिंग 6 वरून 2 पर्यंत मर्यादित करण्यात आल्या.

  • रात्रीच्या वेळेत केवळ 8 तासच उड्डाण परवानगी देण्यात आली.

  • नाईट ड्युटी विंडो रात्री 12 ते पहाटे 6 अशी निश्चित करण्यात आली.

इंडिगोला वाटलं होतं की या नियमांच्या अंमलबजावणीसाठी मुदतवाढ मिळेल, मात्र DGCA कडून कोणतीही सवलत मिळाली नाही. यामुळंच अचानक मोठ्या प्रमाणावर पायलट आणि क्रू अनिवार्य विश्रांतीवर गेले.

उपलब्ध क्रू अभावी वेळापत्रक कोलमडलं

एअरबस A320 च्या सॉफ्टवेअर अपडेटमुळे अनेक फ्लाईट्स उशिरा सुटल्या. परिणामी अनेक पायलटांची ड्युटी नाईट विंडोमध्ये गेली. FDTL लागू असल्याने त्यांना तात्काळ विश्रांतीवर जावं लागलं. यामुळे सोमवारीच इंडिगोच्या शेकडो क्रू मेंबर्स उपलब्ध राहिले नाहीत आणि फ्लाईट शेड्यूल पूर्णपणे कोलमडलं.

यात भर म्हणजे 26 ऑक्टोबरपासून सुरू झालेलं विंटर शेड्यूल, ज्यामुळे फ्लाईट्सची संख्या वाढली होती. इंडिगो एकाच दिवशी 2200 हून अधिक फ्लाईट्स ऑपरेट करते, जी एअर इंडियाच्या तुलनेत दुप्पट आहे. त्यामुळे नियोजनातील थोडीशी चूकही मोठ्या गोंधळात रूपांतरित झाली.

मोठ्या शहरांना सर्वाधिक फटका

गेल्या 48 तासांत —

  • दिल्लीमध्ये 135 उड्डाणे व 90 लँडिंग रद्द

  • बंगळुरूमध्ये 52 लँडिंग आणि 50 उड्डाणे रद्द

एकूण 600 हून अधिक फ्लाईट्स रद्द झाल्याची नोंद आहे.

DGCA चा दिलासा

प्रवाशांचा वाढता संताप आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचं पाहून DGCA ने महत्त्वाचा निर्णय घेतला.1 नोव्हेंबरपासून लागू केलेल्या FDTL मधील साप्ताहिक 48 तास सुट्टीचा नियम तात्पुरता मागे घेण्यात आला आहे. यामुळे क्रूची उपलब्धता वाढणार असून, उड्डाणांचं वेळापत्रक पुन्हा पूर्वपदावर येण्याची शक्यता आहे.

इंडिगोचा दावा

इंडिगोनं स्पष्ट केलं आहे की —“पुढील 48 तासांत सर्व परिस्थिती नियंत्रणात येईल. आमची टीम चोवीस तास काम करत असून प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.”

प्रवाशांना दिलासा मिळणार?

DGCA च्या निर्णयामुळे क्रू उपलब्धता वाढणार असून, मोठ्या प्रमाणावर रद्द होणाऱ्या फ्लाईट्सचा गोंधळ लवकरच आटोक्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, नुकसानीत सापडलेल्या हजारो प्रवाशांच्या संतापावर तोडगा निघेल का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

read also : https://ajinkyabharat.com/tejshwi-yadav-europe-tour-5-secrets-power-guide-to-travel-europe-in-budget/

Related News