अकोट, २ मार्च : होळीच्या पार्श्वभूमीवर अकोट नगरपरिषदेत शिस्तभंगाचा मुद्दा ऐरणीवर आला असून नगराध्यक्ष सौ. माया धुळे यांनी कार्यालयीन वेळेत अनुपस्थित राहणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर भूमिका घेतली आहे. सकाळी १० वाजल्यापासून स्वतः नगरपरिषद कार्यालयात उपस्थित राहून त्यांनी कामकाजाचा आढावा घेतला. मात्र, सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत अनेक जबाबदार अधिकारी व कर्मचारी गैरहजर असल्याचे निदर्शनास आले.
या प्रकारामुळे नगराध्यक्षा संतप्त झाल्या असून नागरिकांच्या कामकाजात अडथळा निर्माण होणे ही गंभीर बाब असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शहरातील नागरिकांना कोणत्याही अडचणींना सामोरे जावे लागू नये, यासाठी कर्मचाऱ्यांनी वेळेत उपस्थित राहून तातडीने समस्या सोडवाव्यात, असे त्यांनी सांगितले.
यावेळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी शशिकांत बाबर यांच्यासोबत त्यांनी चर्चा करत उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. मुख्याधिकारी बाबर यांनीही याबाबत स्पष्ट भूमिका घेत, वेळेत उपस्थित न राहणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येईल, असे सांगितले.
नगराध्यक्षा माया धुळे यांनी स्पष्ट शब्दांत इशारा देत सांगितले की, “मी स्वतः सकाळी १० वाजल्यापासून कार्यालयात उपस्थित आहे. मात्र दुपारी १२ वाजेपर्यंत जबाबदार अधिकारी व कर्मचारी उपस्थित नसणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. प्रत्येकाने आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवून वेळेचे पालन करणे आवश्यक आहे. उशिरा येणाऱ्यांची कोणतीही गय केली जाणार नाही.”
नगरपरिषदेत येणाऱ्या नागरिकांना विविध कामांसाठी — दस्तऐवज, प्रमाणपत्रे, तक्रारी किंवा इतर प्रशासकीय बाबींसाठी — कार्यालयावर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, या कारवाईच्या इशाऱ्यानंतर नगरपरिषद कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून येत्या काळात उपस्थिती व कामकाजावर अधिक लक्ष दिले जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
