सुधारित आयकर विधेयक २०२५ लोकसभेत सादर
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी लोकसभेत ‘सुधारित आयकर विधेयक, २०२५ ’ सादर केले.
विद्यमान आयकर कायदा, १९६५ रद्द करून नवा कायदा लागू करण्याचा या विधेयकाचा उद्देश आहे.
भाजप खासदार बैजयंत पांडा यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने दिलेल्या जवळपास सर्व शिफारशी या सुधारित विधेयकात समाविष्ट केल्याचे अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले.
या विधेयकात हितधारकांकडून आलेल्या अशा सूचनांचाही समावेश करण्यात आला आहे, ज्यामुळे प्रस्तावित कायद्याचा हेतू अधिक स्पष्ट होईल.
‘इन्कम टॅक्स (क्र. २ ) विधेयक, २०२५ ’ आयकराशी संबंधित कायद्याचे एकत्रीकरण आणि सुधारणा करणार असून, सध्याच्या कायद्याची जागा घेईल, असे सीतारामन यांनी सांगितले.
गेल्या शुक्रवारी सीतारामन यांनी ‘नवीन आयकर विधेयक, २०२५ ’ चे मूळ स्वरूप लोकसभेतून मागे घेतले होते.
संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी ११ ऑगस्ट रोजी सुधारित विधेयक सादर होणार असल्याची माहिती दिली होती.
केंद्र सरकारने संसदेतल्या ३१ सदस्यीय निवड समितीच्या शिफारशींचा समावेश करून हे अद्ययावत विधेयक तयार केल्याचे स्पष्ट केले आहे.