मुंबई : शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान दिग्दर्शित ‘द बॅड्स ऑफ बॉलिवूड’ या वेबसीरिजला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असतानाच, अखेरच्या भागातील रणबीर कपूरचा छोटासा कॅमिओ आता वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.या सीरिजमधील एका मिनिटाच्या सीनमध्ये रणबीर ई-सिगारेट ओढताना दाखवला आहे. मात्र या दृश्यादरम्यान धूम्रपानविरोधी चेतावणी न दाखवल्याने राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने आक्षेप घेतला आहे. आयोगाच्या मते, या प्रकारामुळे तरुणाईवर विपरीत परिणाम होऊ शकतो.
सामाजिक कार्यकर्त्याची तक्रार
सामाजिक कार्यकर्ते विनय जोशी यांनी याबाबत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारीनंतर आयोगाने तातडीने कारवाई करत मुंबई पोलिसांना सीरिजचे निर्माते आणि कलाकारांविरोधात एफआयआर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. तसंच, माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयालाही याबाबत पावलं उचलण्यास सांगितलं आहे.
सीनमध्ये नक्की काय दाखवलंय?
धर्मा प्रॉडक्शनच्या ऑफिसमधील वातावरणावर आधारित या सीनमध्ये रणबीर कपूरची एंट्री डॅशिंग अंदाजात होते. त्याला पाहून नायिका सान्या प्रभावित होते. हलक्या-फुलक्या संवादादरम्यान रणबीरला ई-सिगारेट दिली जाते आणि तो कॅज्युअली झुरका घेतो. त्यानंतर मजेशीर पद्धतीने सान्याला मॅनेजर होण्याची ऑफर देतो. सीन संपतो, पण त्याचं धूम्रपान करताना दाखवलेलं दृश्य आता वादाचं कारण ठरत आहे.
आर्यन खानच्या प्रोजेक्टवर संकट
आर्यन खानच्या दिग्दर्शनाला प्रेक्षकांची चांगली दाद मिळत असतानाच या वादामुळे सीरिजवर नवं संकट ओढावलं आहे. रणबीर कपूरच्या एका मिनिटाच्या कॅमिओमुळे संपूर्ण टीमसाठी डोकेदुखी निर्माण झाली असून, पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
read also : https://ajinkyabharat.com/40-granted-teachers-theate-100-shaet/
