गॅस सिलिंडरने पेट घेतल्याने घर जळून खाक

भंडारी येथील घटना, घर मालकाचे तीन लाख रुपयाचे नुकसान
सिंदखेडराजा : सिलिंडरने पेट घेतल्याने संपूर्ण घर जळून खाक झाल्याची घटना तालुक्यातील भंडारी येथे ३१ ऑक्टोबर रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत घर मालकाचे २ लाख ९५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. ग्रामस्थांच्या सजगतेमुळे सुदैवाने जीवितहानी टळली.
तालुक्यातील भंडारी येथील अविनाश श्रीराम जायभाये वय ३९ हे पत्नी गीतासोबत गावातील शेतात मोलमजुरी करून चरितार्थ चालविता. त्यांना तीन अपत्ये आहेत. ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी जायभाये यांची पत्नी कामाला जाण्यासाठी उठून स्वयंपाक करत असतांना सिलिंडरने पेट घेतला. तो विझविण्याचा प्रयत्न करण्यात आला.  परंतू आगीची व्याप्ती घरात वाढल्यामुळे अपत्यांना बाहेर घेऊन त्यांनी आरडा ओरड केली. परंतु तोपर्यंत घर आगीच्या विळख्यात सापडले होते.  यावेळी ग्रामस्थांनी पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. परंतू तोपर्यत घर जळून खाक झाले होते. वेळीच आग आटोक्यात आल्याने शेजारील घरे वाचली. या आगीत घरावरील टिनपत्रे, दरवाजे, अँगर, घरातील साहित्य, संसारपयोगी वस्तू, रोख ४० हजार रुपये, अन्न धान्य असे साहित्य जळून खाक झाले. या घटनेत घर मालक जायभाये यांचे जवळपास २ लाख ९५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. तलाठी सुशील शिलवंत यांनी पंचनामा केला. पोलिसांनीही घटनास्थळ गाठून पहाणी केली.

Related News