महावितरणच्या स्मार्ट मीटर बसविण्याच्या कामगिरीचा ‘ बिग इम्पॅक्ट ’ पुरस्काराने गौरव

बिग इम्पॅक्ट

नागपूर, दि. 26 फेब्रुवारी 2026: महाराष्ट्रातील वीज वितरण क्षेत्रात महावितरणने केलेली उत्कृष्ट कामगिरी राष्ट्रीय स्तरावर गौरवली गेली आहे. मुंबईतील सहारा स्टार हॉटेलमध्ये बुधवारी (25 फेब्रुवारी) आयोजित कार्यक्रमात महावितरणला ‘बिग इम्पॅक्ट’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 92.7 बिग एफएम या लोकप्रिय रेडिओ चॅनलच्या वतीने विविध क्षेत्रातील नाविन्यपूर्ण उपक्रम व समाजावर सकारात्मक प्रभाव टाकणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा गौरव करण्यात येत असतो.

या समारंभात मुंबई महानगरपालिकेच्या महापौर श्रीमती रितू तावडे आणि अभिनेत्री ईशा देवोल यांच्या हस्ते महावितरणच्या वतीने कार्यकारी संचालक श्री. धनंजय औंढेकर, मुख्य अभियंता श्री. प्रवीण परदेशी, मुख्य जनसंपर्क अधिकारी श्री. भारत पवार यांनी पुरस्कार स्वीकारला. राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. आशिष शेलार तसेच जेष्ठ अभिनेते बोम्मण ईराणी यांची उपस्थिती कार्यक्रमात विशेष ठरली. याशिवाय सिनेसृष्टी, सामाजिक, राजकीय, उद्योग, कला क्षेत्रातील नामवंत उपस्थित होते.

महावितरणने राज्यभरात 88.50 लाख अत्याधुनिक स्मार्ट मीटर बसवून देशात प्रथम क्रमांक मिळविला आहे. या स्मार्ट मीटरद्वारे ग्राहकांना अचूक बिल, दर तासाला मोबाईलवर विजेचा वापर तपासण्याची सुविधा, सवलतीच्या दरात उपकरणांचा वापर नियोजनाने करण्याची संधी मिळते, तसेच विजेचा वापर नियंत्रित ठेवता येतो. घरगुती ग्राहकांना प्रति युनिट 80 पैसे टीओडी सवलतही मिळते. औद्योगिक आणि वाणिज्यिक ग्राहकांना सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या कालावधीत विजेचा वापर करण्यावर सवलत लागू आहे.

Related News

राज्यात 9 ते 23 फेब्रुवारी या कालावधीत स्मार्ट मीटर जनजागृती पंधरवडा आयोजित करण्यात आला. या उपक्रमांतर्गत राज्यभरातील नागरिकांना स्मार्ट मीटरच्या फायदे, अचूक बिलिंग, वीज बचत व सुविधांबाबत माहिती देण्यात आली. यामुळे नागरिकांमध्ये जागरूकता वाढली आणि महावितरणच्या या नवोन्मेषात्मक उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित झाले.

स्मार्ट मीटर बसवून ग्राहकांना अधिक सुविधा, अचूक बिलिंग, वीज बचत व जागरूकता या अनेक क्षेत्रांत लाभ देणाऱ्या महावितरणला ‘बिग इम्पॅक्ट’ पुरस्कार मिळाल्यामुळे राज्यातील वीज वितरण क्षेत्रातील नाविन्यपूर्ण कामगिरीची दखल राष्ट्रीय पातळीवर झाली आहे.

read also :  https://ajinkyabharat.com/kdmc-file-theft-scandal-2-building-documents-missing/

Related News