अकोला : न्यू ईरा माध्यमिक विद्यालय, अकोला येथे दि. १७ जानेवारी २०२६ रोजी दुर्मिळ नाणी, चलनी नोटा व टपाल तिकिटांचे भव्य आणि ऐतिहासिक प्रदर्शन उत्साहात पार पडले. माजी विद्यार्थी तथा संग्राहक श्री. मकरंद केशवराव उंटवाले यांच्या वैयक्तिक संग्रहाचे हे प्रदर्शन विद्यार्थ्यांसह इतिहासप्रेमींसाठी विशेष आकर्षण ठरले.
या प्रदर्शनात प्राचीन, मध्ययुगीन, मुघलकालीन, ब्रिटिश-इंडिया तसेच स्वतंत्र भारतातील नाणी व नोटा पाहायला मिळाल्या. अयोध्येतील श्रीराम मंदिराचे चित्र असलेली स्मरणिकेची नाणी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यातील सुवर्ण होन व ताम्रधातूची शिवराई, देश-विदेशातील विविध चलने, प्लास्टिकची नाणी, ब्रिटिशकालीन पोस्टकार्ड्स, फर्स्ट-डे कव्हर्स तसेच रामायण, महाभारत, कुंभमेळा, भारतीय सेनादल आणि राष्ट्रपुरुषांवर आधारित टपाल तिकिटांनी प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेतले.
प्रदर्शनाचे उद्घाटन प्रागतिक शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. प्रा. विश्वनाथ गद्रे यांच्या शुभहस्ते पार पडले. यावेळी मुख्याध्यापक श्री. महेश ठोके यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच श्री. मकरंद उंटवाले यांच्यासह त्यांच्या पत्नी सौ. अंजलीताई, निवृत्त शिक्षक श्री. नरेश मानकर आणि माजी विद्यार्थिनी सौ. अनुपमाताई आब्दे (पत्की) उपस्थित होत्या. त्यांनीही आपल्या संग्रहातील दुर्मिळ नाणी व पोस्टकार्ड्स विद्यार्थ्यांसमोर मांडले.
Related News
अकोला ते शिमला… 8 वर्षांनंतर बेपत्ता जयेशचा शोध, गोशाळेत मजुरी करत जगत होता आयुष्य
VBA : वंचित आघाडीचा जलवा; प्रस्थापितांना दिला दणका, 3 महापालिकांत ‘निळं वादळ’
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी – तिक्ष्णगत मल्टीपर्पज वेल्फेअर सोसायटी व एल.एन.पी. कॉन्व्हेंटचे संयुक्त आयोजन
अकोला–बुलढाणा सीमेवर बिबट्याच्या पिल्लांचा आढळ ; व्हायरल व्हिडिओमुळे वन्यजीव सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
अकोला जिल्ह्यात 161 police शिपाई पदे
या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. इतिहासाची पुस्तकी माहिती प्रत्यक्ष पाहण्याची व समजून घेण्याची संधी मिळाल्याने विद्यार्थी विशेष आनंदित झाले. प्रदर्शनाच्या यशस्वी आयोजनासाठी नरेश मानकर, अजयसिंग राजपूत, हबीब खानसाहेब, माजी विद्यार्थी आगरकर तसेच इतर सहकाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले.
डिजिटल युगात इतिहासाशी थेट संवाद साधण्याची संधी देणारे हे प्रदर्शन विद्यार्थ्यांसाठी ज्ञानवर्धक ठरले असून, भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात येईल, असे संकेत संस्थाचालकांनी दिले.
