राज्यभर FDA च्या धडक कारवाया; 65 लाखांचा माल जप्त, 350 किलो भेसळयुक्त खवा फेकून पळाले !

FDA

 राज्यभर FDA च्या धडक कारवाया

मुंबई : कठोर प्रशासन, शिस्तप्रिय कार्यपद्धती आणि नियमांबाबत कोणतीही तडजोड न करणारे अधिकारी अशी ओळख असलेले आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्तपदाची सूत्रे हाती घेताच राज्यभर कारवाईचा धडाका सुरू केला आहे. भेसळयुक्त अन्नपदार्थ, प्रतिबंधित गुटखा, संशयास्पद खाद्यतेल आणि विनापरवाना औषध विक्री करणाऱ्यांवर FDA ने मोठी मोहीम उघडली असून या कारवायांमुळे भेसळखोर आणि बेकायदेशीर व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

राज्यात विविध ठिकाणी छापेमारी, पाठलाग, जप्ती आणि गुन्हे दाखल करण्याच्या कारवाया सुरू असून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे पुण्यात FDA च्या धास्तीने तब्बल 350 किलो भेसळयुक्त खवा शेतात फेकून अज्ञात टोळीने पळ काढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Related News

नागपुरात 65 लाखांहून अधिक किमतीचा माल जप्त

नागपूरमध्ये FDA च्या पथकाने मोठी कारवाई करत 65 लाख रुपयांहून अधिक किमतीचा माल जप्त केला. धंतोली परिसरातील एका त्वचा, लेझर आणि हेअर ट्रान्सप्लांट क्लिनिकवर छापा टाकण्यात आला. या कारवाईत विनापरवाना साठवण्यात आलेला लाखो रुपयांचा अॅलोपॅथिक औषधसाठा आढळून आला.

तपासादरम्यान संबंधितांकडे औषध खरेदीची कागदपत्रे तसेच औषध विक्री परवाना नसल्याचेही उघड झाले. याशिवाय प्रतिबंधित न्यूट्रास्युटिकल उत्पादनांचाही मोठा साठा जप्त करण्यात आला.

जालन्यात 13 लाखांचे भेसळयुक्त तूप जप्त

जालना जिल्ह्यातील तीर्थपुरी येथे FDA ने मुंदडा इंडस्ट्रीजवर छापा टाकून तब्बल 1,903 लिटर भेसळयुक्त तूप जप्त केले. या तुपात खाद्यतेल आणि कृत्रिम इसेन्सचा वापर होत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले.

सुमारे 13 लाख रुपयांचा हा साठा जप्त करण्यात आला असून संबंधित आस्थापनाला सील ठोकण्यात आले आहे. तुपाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

गोंदियात संशयास्पद सोयाबीन तेलाचा साठा जप्त

गोंदिया शहरातील ‘गुरुनानक चिरोंजी भंडार’ या प्रतिष्ठानावर FDA ने धाड टाकून 688.4 किलो रिफाइंड सोयाबीन तेल जप्त केले. सुमारे 1.37 लाख रुपये किमतीच्या या साठ्याबाबत गंभीर संशय व्यक्त करण्यात आला आहे.

तपासादरम्यान वापरलेल्या जुन्या आणि दूषित टीनच्या डब्यांमध्ये तेलाचे रिपॅकिंग होत असल्याचे आढळून आले. अशा प्रकारच्या पुनर्वापरामुळे आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

समृद्धी महामार्गावर 60 लाखांचा गुटखा पकडला

FDA ने समृद्धी महामार्गावर मोठी कारवाई करत इंदोरहून पुण्याकडे जाणारे वाहन ताब्यात घेतले. या वाहनातून प्रतिबंधित पानमसाला आणि सुगंधित तंबाखूचा सुमारे 42.50 लाख रुपयांचा साठा जप्त करण्यात आला.

याशिवाय 18 लाख रुपये किमतीचे वाहनही जप्त करण्यात आले. एकूण 60.50 लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला असून संबंधितांवर दौलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

FDA च्या धास्तीने 350 किलो भेसळयुक्त खवा शेतात फेकला

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील शिरसगाव काटा येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला. FDA च्या कारवाईची माहिती मिळताच अज्ञात टोळीने तब्बल 350 किलो भेसळयुक्त खवा शेतात फेकून पळ काढला.

हा खवा बाजारात विक्रीसाठी जाणार होता का, याचा तपास सुरू असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्याची मागणी होत आहे.

इंदापूरात गुटखा माफियांना दणका

इंदापूरमध्ये FDA आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि तंबाखूजन्य पदार्थ जप्त केले. या कारवाईत विविध ब्रँडचा साठा हस्तगत करण्यात आला.

सुमारे 1.07 लाख रुपयांचा प्रतिबंधित माल आणि 1.50 लाख रुपये किमतीचे वाहन जप्त करण्यात आले. एकूण 2.57 लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला असून तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संभाजीनगरात संशयित तूप जप्त

छत्रपती संभाजीनगरमधील गजानन नगर परिसरातील प्रसन्ना डेअरी अँड फूड्सवर FDA ने धाड टाकून संशयित गायीच्या तुपाचा साठा जप्त केला. सैल स्वरूपात विक्रीसाठी ठेवलेले तूप जप्त करून त्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

अहवाल आल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे FDA ने स्पष्ट केले आहे.

भेसळखोरांमध्ये भीतीचे वातावरण

तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर FDA ची यंत्रणा अधिक सक्रिय झाल्याचे चित्र दिसत आहे. राज्यभर सुरू असलेल्या धडक कारवायांमुळे भेसळयुक्त अन्नपदार्थ, बनावट तूप, संशयास्पद तेल, प्रतिबंधित गुटखा आणि विनापरवाना औषध विक्री करणाऱ्यांमध्ये मोठी घबराट पसरली आहे.

नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत. त्यामुळे येत्या काळात राज्यभर अशाच आणखी मोठ्या कारवाया होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

read also : https://ajinkyabharat.com/ramcharans-superhit-danaka-peddichi-112-crores-bumper-opening/

Related News