आठवपैल: एका आठवणीच्या किनाऱ्यावर

आठवपैल: एका आठवणीच्या किनाऱ्यावर

शाळेची मधातली सुट्टी झालेली. हळूहळू दुपार टळू लागतेय. सुट्टीमुळे पोरे उनाड वासरासारखी घराकडे पळालेली!

मी निवांतपणे वर्गात बसलेलो असतोय… एवढ्यात मला आठवतंय,

काल आलेले बरेचसे कॉल किंवा मिसकॉल आपण घेऊही शकलेलो नाही आणि लावूही शकलेलो नाही.

Related News

मोबाईल काढून मिसकॉल चेक करतोय. एक-दोन लावतोय. त्यातलाच एक नंबर लावलेला. लांबवर रिंग जात असल्याचं जाणवतंय.

काही क्षणातच पलीकडून फोन उचलल्याचं कळतंय. मी शब्दात बरीचशी उत्सुकता आणून हळूच विचारतोय, ‘हॅलो! कोण?’

‘कोण हवंय आपल्याला?’ पलीकडून मधाळशा आवाजातला एक प्रपंच! मी स्वतःला थोडसं

सावरून तपशील पुरवतोय… ‘मी… बोलतोय… काल आपण मला मिसकॉल केलेला होता… पण काल एवढे फोन आले होते की,

आपल्याला फोन करता आलाच नाही…’ मी सगळंच एका श्वासात सांगितलेलं. ‘अय्या, अच्छा आपण?

ओहो माय गॉड, स्वारी हं! मी ओळखलंच नाही आपल्याला… मी स्नेहल पोटभरे… गंगापूरवरून बोलतेय…

पण पुन्हा एकदा स्वॉरी हं!’ तिला धाप लागल्याचं मला कळतंय… काय बोलावं ते मला काहीच सूचत नाही. मी फक्त ऐकत असतोय…

‘तुमची कालची सकाळमधली कविता काय सुंदर होती! मला खूपच आवडली! किती सुंदर लिहीताय तुम्ही!

मी कितीदा वाचली म्हणून सांगू?’ खरंतर, तिलाच किती सांगू आणि किती नाही झाल्याचं मला जाणवत होतंय.

मी फक्त संमतीदर्शक हुंकार भरत असतो.

या दरम्यान मी काहीतरी विचारायचं म्हणून विचारून बसतो, ‘काय करता आपण?…

आणखी कोण-कोण आहेत आपल्या घरी? आपले मिस्टर काय करतात? त्यांनाही बोलू

द्या ना थोडंसं माझ्याशी’ मी अनेक प्रश्न विचारलेले. पण पलीकडून ती खळाळून हसल्याचं जाणवतंय…

‘अहो कुठले मिस्टर? लग्नच व्हायचंय अजून.’ तिच्या शब्दातलं खट्याळपण नेमकं जाणवतंय…

‘बरं कविता वाचल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!’ मी.

‘तुमचे पण धन्यवाद!’ ती गोडसं बोलत राहतेय.

‘अच्छा बाय,’

‘बाय,’

मी फोन ठेवतोय. ती पण ठेवतेय. मुलं शाळेत आलेली असतात.

आठवणींचा किनारा

पळ, क्षण, दिवस, महिने निघून चाललेले. कामाच्या व्यापात मीही आकंठ बुडालेलो.

थोडं लेखनही चालू असतंय. वर्तमानपत्रांमधून प्रसिद्ध होतंय. फोन, पत्र, मॅसेज येत राहतात.

जगण्याच्या रहाटगाडग्याला जुळलेलं मन ह्या काही अवचित सुखद क्षणांपाशी अधून-मधून

थांबतेय आणि पुन्हा धावू लागतेय एका वेगळ्या आवेशात! अचानक काही महिन्यानंतर एका दिवशी पुन्हा तो नंबर खणखणतोय…

‘हॅलो आपण बोलत आहात ना?’ ती मिश्किलपणे विचारतेय.

‘होयऽऽ’ मी आश्चर्यचकित झालेलो.

‘राग तर आला नाही ना माझा? मी पुन्हा फोन केलाय म्हणून.’

‘ओहऽऽ नाही. राग का बरं येणार? उलट आनंदच वाटत आहे की, तुम्ही एवढे दिवसानंतर पुन्हा फोन केलाय त्याचा.’

‘खरं सांगू? मला पुन्हा बोलावसं वाटलंय तुमच्या सोबत. गेले कित्येक दिवसांपासून ठरवतेय पण हिमंत होत नाही.

आज मनाला न जुमानताच पुन्हा फोन केलाय तुम्हाला!’

ती पाऊस पडून गेलेल्या आभाळासारखी मनातून निरभ्र स्वच्छ झालेली! ती बोलत राहतेय आपल्याच तंद्रीत.

तिचे शब्द फुलांचं अनोखं कोवळंपण घेऊन आलेले. मी फक्त ऐकत राहतोय…

संवादाच्या सावल्या

आता तिचे फोन केव्हाही खणखणतात! सुखद आश्चर्याचा धक्का देत वेळी-अवेळी. मी थोडासा चिंतीत आणि अचंबितही!

पण मलाही तिच्या नियमित येणाऱ्या फोनचा लळा लागलेला. एखाद्या दिवशी फोन आलाच नाहीतर

चुकल्यासारखं वाटतंय. ती पण हे ओळखून असलेली. तिन्ही सांजेच्या कातरवेळेला ती लावतेय फोन,

तिच्या शब्दात हृदयातलं लावण्य उतरून आलेलं ती बोलत राहतेय भरभरून भारावल्यासारखी! मी फक्त ऐकत राहतोय…

वेदनेचा किनारा

कधी कुठे एखादी टिटवी आकाशातून जमिनीवर झेप घेत कर्णकर्कश ओरडतेय. फुलांचा दरवळ दूरवर गेलेला.

मला ती बाऱ्याच्या आवेगावर टपटपत असलेली फुलं अचानक आवडू लागतात.

तीचे शब्दही फुलांसारखेच ताजे, टवटवीत! ती बोलत राहतेय भरभरून.

तिचे श्वास भरून आल्याचं जाणवतंय. तिच्या श्वासांचा तर हा सुगंधी दरवळ नसेल ना?

माझ्या मनात एक चुकार भास!

पण नकळतच सगळं विस्कटून गेलेलं… मग दिवसाच्या कुठल्याही क्षणी येणारे तिचे फोन बंद होतात,

पत्रही येत नाहीत आणि मॅसेज तर मागमूसही देत नाहीत!

मी हळवा… उद्ध्वस्तेच्या काठावर उभा असलेला! पुन्हा-पुन्हा तिला विनवू पाहतोय पण ती फोन उचलत नाहीय!

संपर्काच्या सगळ्या माध्यमांना तिनं अलविदा केलेलं! खरंतर, आताही फोन येतात,

मॅसेजही येतात आणि काही भावगंधीत पत्रंही… पण ह्यात तिचं काही एक नसतंय…

कविता आणि लेख आजही प्रकाशित होत असलेले… ती मात्र आठवत राहतेय क्षणाक्षणाला,

गेलेल्या क्षणांच्या पैलतीरी उभी राहून!… आणि अधामधात खणखणाऱ्या फोनमधून

मी शोधत राहतोय तिचा आवाज, कधीतरी ती भरभरून बोलेलं म्हणून

Related News